अमळनेरात अन्न व औषध विभागाने तपासणीसाठी अंडी घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 20:11 IST2018-02-11T20:06:05+5:302018-02-11T20:11:32+5:30
अमळनेरमध्ये कृत्रीम अंडे विक्री होत असल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी केल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाच्या अधिकाºयांनी एका विक्रेत्याकडे छापा टाकून नमुने ताब्यात घेतले आहेत.

अमळनेरात अन्न व औषध विभागाने तपासणीसाठी अंडी घेतली ताब्यात
लोकमत आॅनलाईन
अमळनेर, दि.११ : शहरात कृत्रिम अंडे आढळून आल्याने आमदार शिरीष चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नसीरखाँ हुसेनखाँ या विक्रेत्याच्या बेस्ट आम्लेट सेन्टरवर रविवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आर. आर. चौधरी यांनी छापा टाकून काही अंड्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, तक्रारदार संग्राम पाटील, किरण गोसावी, दीपक मद्रासी उपस्थित होते. नसीरखाँ हे अंड्यांचे होलसेल विक्रेते आहेत. त्यांनी चौकशीत सदर अंडी धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथून आणल्याचे सांगितले. अन्न निरीक्षक चौधरी यांनी धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क करून याबाबत माहिती दिली व सदर चौकशी करावी अशी विनंती केली.
दरम्यान, केशवनगर भागातील संग्राम पाटील यांनी बंगाली फाईल भागातील शिवतीर्थ महाजन यांच्या दुकानातून ७ फेब्रुवारी रोजी १२ अंडे घेतले होते. त्यांनी सदर अंडे उकळल्यानंतर ते कृत्रिम असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती, तसेच संग्राम पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्यापुढे सदर अंडे कृत्रिम असल्याचा प्रयोगच करून दाखवला होता. यानंतर आमदार चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क करून याबाबत तक्रार केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शहरात कृत्रिम अंडे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. अमळनेर शहरात तीन होलसेल विक्रेते आहेत. तर अंडापाव, आम्लेट विकणाºयांच्या शेकडो हातगाड्या आहेत. त्यात किराणा दुकानातूनही अंड्यांची नेहमी विक्री केली जाते. त्यामुळे अंडे खाणाºयांनी सावधानता बाळगणे महत्वाचे आहे.