मू.जे.च्या हस्तलिखितांच्या खजिन्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:57+5:302021-07-24T04:11:57+5:30
जळगाव : भारत सरकारच्या पांडूलिपी मिशन अंतर्गत मू.जे. महाविद्यालयात हस्तलिखित संरक्षण केंद्र सुरू असून, याठिकाणी दुर्मीळ हस्तलिखितांच्या जतन व ...

मू.जे.च्या हस्तलिखितांच्या खजिन्यात भर
जळगाव : भारत सरकारच्या पांडूलिपी मिशन अंतर्गत मू.जे. महाविद्यालयात हस्तलिखित संरक्षण केंद्र सुरू असून, याठिकाणी दुर्मीळ हस्तलिखितांच्या जतन व संरक्षणासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. सुमारे ११९ बाडांचे (३,३१२ पानांचे) सुधारात्मक संरक्षण आणि ३३९ बाडांचे (११,२३५ पानांचे) प्रतिबंधात्मक संरक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, आता रत्नागिरीतील राजापूर संस्कृत पाठशाळांकडून ८०० विविध विषयांवरचे हस्तलिखित दान स्वरूपात महाविद्यालयाला प्राप्त झाली असल्याची माहिती मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन २०१३ साली रावेर येथून ५० हस्तलिखित देणगी स्वरूपात प्राप्त झाल्यापासून महाविद्यालयातील ग्रंथालयात हस्तलिखितांचे दालन सुरू झाले. त्याचवर्षी नांदेड येथील कोळंबी मठ येथून ३५० हस्तलिखित व ऐतिहासिक कागदपत्रे प्राप्त झाली. त्यानंतर ग्रंथपाल डॉ.व्ही. एस. कंची यांनी सन २०१६ ते २०१८ या कालावधीत विविध दुर्मीळ हस्तलिखित गोळा केली. त्याचे आता जतन आणि संरक्षण केले जात आहे. प्रयोगशाळेत हस्तलिखितांवर प्रक्रिया करून त्यांचे आर्युमान २०० वर्षापर्यंत वाढविण्यात येत आहे. परिणामी, पुढच्या पिढीला तो ज्ञानाचा वारसा प्राप्त होईल आणि भारतीय प्राचीन संस्कृतीची माहिती मिळेल, अशीही माहिती प्राचार्य यांनी दिली.
दुर्मीळ हस्तलिखितांची माहिती द्यावी
ज्या व्यक्तींकडे दुर्मीळ हस्तलिखिते आहेत, अशांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून तो ज्ञानाचा वारसा पुढील पिढीसाठी जतन व संवर्धन होईल, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला ग्रंथपाल डॉ. व्ही.एस.कंची, हेमंत जोशी, संदीपकुमार केदार आदी उपस्थित होते. दरम्यान, डेक्कन पुणे येथील ५० बाडांचे सुधारात्मक संरक्षण करण्यात आले असल्याचे डॉ. कंची यांनी सांगितले.