तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामाला गती न मिळाल्यास ठेकेदारावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:39+5:302021-01-14T04:13:39+5:30

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करून टेंडर ...

Action will be taken against the contractor if the work on Tarsod to Phagne highway is not speeded up | तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामाला गती न मिळाल्यास ठेकेदारावर कारवाई

तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामाला गती न मिळाल्यास ठेकेदारावर कारवाई

googlenewsNext

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करून टेंडर रद्द करावे व तातडीने काम पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत, या प्रमुख मागणीसाठी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय सडक परिवहन, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या प्रमुख मागणीसह जळगावातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सब टेक्नॉलॉजी सेंटर, कन्नड घाटातील बोगद्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे, जळगाव शहरातील महामार्गाच्या कामांतर्गत खोटेनगरसह दोन ओव्हर ब्रीजला मंजुरी देण्याची मागणीही मंजूर झाल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.

३० ते ५० कोटी रुपये खर्चून सब टेक्नॉलॉजी सेंटर

मतदारसंघातील चार महत्त्वाच्या समस्यांविषयी खासदार पाटील यांनी नितीन गडकरी यांची भेट घेत, या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. यामध्ये जळगाव शहरात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील जागेत नवीन टेक्नॉलॉजी सेंटर उभारावे, अशी मागणी केली असता, यावर केंद्रीय मंत्र्यांनी औरंगाबाद येथील इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटरचे सब टेक्नॉलॉजी सेंटर जळगाव येथे मंजूर केले. ३० ते ५० कोटी रुपये खर्चून हे सेंटर उभे राहणार आहे. यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कन्नड घाट टनेल प्रस्तावाला मिळणार अंतिम मंजुरी

कन्नड घाटातील टनेल (बोगदा) महत्त्वाकांक्षी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होणार असून, त्यासाठी कितीही निधी लागला, तरी कन्नड घाट टनेल (बोगदा मार्ग ) प्रस्ताव अंतिम मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिल्याचे खासदारांनी सांगितले.

महामार्ग डीपीआरमध्ये दुरूस्ती

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग डीपीआरमध्ये सुटलेले खोटेनगरसह दोन ओव्हर ब्रीज मंजूर करून हा डीपीआर दुरूस्त करून त्यामध्ये हे ओव्हरब्रीज तयार करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जळगाव-नांदगाव महामार्ग हा मार्ग पाचोरा, भडगाव, चाळीसगाव शहरातून गेला आहे. हे रस्ते शहराला लागून असून, शहरातून जाणाऱ्या रस्त्याची कामे पूर्ण करावी व त्यांची अधिक उपयोगिता वाढावी, अशी मागणी केली होती. ती देखील मागणी मंजूर करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी दिली सर्वच कामांना मंजुरी

जळगाव लोकसभा मतदारसंघातील चारही महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत. यामुळे जिल्ह्यातील दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटरचे सब टेक्नॉलॉजी सेंटर उभे राहणार असल्याने जळगावचे शैक्षणिक महत्त्व वाढणार असल्याचा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Action will be taken against the contractor if the work on Tarsod to Phagne highway is not speeded up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.