वैयक्तिक वादाला सामाजिक वादाचे स्वरूप दिल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:49+5:302021-08-13T04:20:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रावेर : आपल्या वैयक्तिक वादाला सामाजिक वादाचे स्वरूप देऊन अनावश्यकरित्या पीडित वा अन्यायग्रस्त परिवारातील ...

वैयक्तिक वादाला सामाजिक वादाचे स्वरूप दिल्यास कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : आपल्या वैयक्तिक वादाला सामाजिक वादाचे स्वरूप देऊन अनावश्यकरित्या पीडित वा अन्यायग्रस्त परिवारातील कमाल १० ते १५ जणांखेरीज आपण पूर्ण जातीधर्माच्या लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून शांततेचा भंग करीत असाल तर, संबंधितांविरुद्ध अनुचित घटना घडवण्याच्या कटात सहभागी झाल्याचा आरोप ठेवून आपणाविरुध्द गुन्हा प्रक्रिया संहिता १६० अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची कायदेशीर प्रणाली बेकायदेशीर जमावाला चाप लावण्यासाठी सबंध जिल्हाभरात राबवणार असल्याची घोषणा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी येथे केली.
रसलपूर येथील दोन जातीधर्मातील युवक- युवती बाहेरगावी निघून गेल्याच्या घटनेत पोलीस प्रशासनावर एका गटाने दबाव आणण्यासाठी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी त्यांनी गंभीर दखल घेतली. संबंधितांविरुद्ध गुन्हा प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये नोटीस बजावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रावेर पोलीस ठाण्याचे आवारात मोहरम, श्रावण मास, गणेशोत्सव सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उपअधीक्षक विवेककुमार लावंड, तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर मुख्याधिकारी रवींद्र लांडे व गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचे रावेर पोलीस स्टेशनतर्फे स्वागत करण्यात आले. किंबहुना, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, सिंधी समाजबांधवांनी तथा शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी रावेर पोलीस स्टेशनतर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सन्मानित करण्यात आलेल्या रावेर येथील पत्रकार दिलीप वैद्य, देवलाल पाटील, कृष्णा पाटील, सुनील चौधरी व समशेर खान या पत्रकारांचा डॉ. मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, रावेर न.पा.चे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांची बदली झाल्याने त्यांचाही सत्कार करून निरोप देण्यात आला.
दरम्यान, रावेर मुस्लीम पंच कमेटीतर्फे इमाम गयासोद्दीन, हिंदू पंच समितीचे पद्माकर महाजन, रसलपूर येथील अय्युब पहेलवान यांनीही सामाजिक व धार्मिक सौहार्द जोपासण्यासाठी मनोगत व्यक्त केले.
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन करीत महसूल व पोलीस प्रशासन शांततेचा भंग केल्यास सज्ज असल्याचा इशारा दिला. प्रशासकीय अधिकारी हे पाहुणे कलाकार असल्याने आपणच आपल्या शहराचा दंगलींमुळे रेंगाळणारा विकास थांबणार नाही म्हणून दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी युसूफ शेख, आसिफ मोहंमद, डॉ सुरेश पाटील, संतोष पाटील, कांता बोरा, शारदा चौधरी, शेख सादीक, योगिराज पाटील, डॉ. दत्तप्रसाद दलाल, शैलेंद्र अग्रवाल, सावन मेढे, भास्कर महाजन, नितीन महाजन, कलीम शेख, पद्माकर महाजन, शब्बीर शेख, ॲड. योगेश गजरे, संघरक्षक तायडे, पंकज वाघ, प्रदीप सपकाळे, विजय मनवाणी, मोहरम पंच कमेटीतर्फे गयास शेख, असदुल्ला खान, ईस्माईल पहेलवान, मेघा भागवत, सुनीता डेरेकर, गझाला तब्बसुम, कल्पना पाटील, बौद्ध समाज पंच मंडळातर्फे दिलीप साबळे, दिलीप कांबळे, पंकज वाघ, युवराज ठाकरे, रसलपूर मुस्लीम पंच कमेटी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, भावलाल महाजन, अशोक शिंदे, बॅटरी व्यावसायिक इम्रान शेख, माऊली फाउंडेशनचे डॉ. संदीप पाटील, मनोज श्रावक, दिलीप पाटील, फौजदार मनोज वाघमारे, मनोहर जाधव व अनिस शेख आदी उपस्थित होते.
आभार सपोनि शीतलकुमार नाईक यांनी मानले
120821\img_20210812_124752.jpg
रावेर पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे व व्यासपीठावर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस उपअधीक्षक विवेककुमार लावंड, मुख्याधिकारी रविंद्र लांडे दिसत आहेत.