गिरणा नदीत विसर्जनावर बंदी
जळगाव : शहरालगत वाहणाऱ्या गिरणा नदीच्या निमखेडी, गिरणा पंपीग व बांभोरी पुलालगत काठावरील भाग कोसळल्याने मोठी दरी व कपार तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणून मनपा प्रशासनाने गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनास बंदी घातली आहे. यासह मेहरूण तलाव भागातील बंधाऱ्याकडील भागाकडेदेखील विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी मनपाकडून कोणतीही व्यवस्था नसून, नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मनपाकडून करण्यात आली आहे.
केळी पीक विम्याची रक्कम मिळेना
जळगाव : तालुक्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना २०१९ - २०मध्ये विम्याचा हप्ता भरूनदेखील नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. याबाबत अनेक शेतकरी शासकीय कार्यालयांच्या चक्कर मारत असून, प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. याबाबत फुपणीचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
मनपा १० वाहनांसह २३ ट्रॉल्या भंगारात काढणार
जळगाव : महानगरपालिकेच्या मालकीच्या ५३ वाहनांचा पाच वर्षात लिलाव केल्यानंतर आता मुदत संपलेल्या आणखी १० वाहनांसह २३ ट्रॉल्या भंगारात काढण्यात येणार आहेत. या वाहनांचा दोन महिन्यात जाहीर लिलाव केला जाणार असून, त्यासाठी आरटीओकडून मंजुरी मिळाली असून, महापालिकेच्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.