जिल्हा बँकेच्या १२ लाख खातेदारांचे खाते क्रमांक बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:28+5:302021-07-28T04:17:28+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा बँकेने आरबीआयच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १२ लाख खातेदारांचे खाते क्रमांक अचानक बदलले ...

जिल्हा बँकेच्या १२ लाख खातेदारांचे खाते क्रमांक बदलले
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा बँकेने आरबीआयच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १२ लाख खातेदारांचे खाते क्रमांक अचानक बदलले आहेत. मात्र, याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही माहिती दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अनेक शेतकरी जुन्या खाते क्रमांकावर व्यवहार करीत असताना, त्या खात्यात ती रक्कम पडत नसल्याचा तक्रारी वाढल्या आहेत.
आरबीआयने दिलेल्या नवीन निकषांनुसार बँक खाते हे १६ अंकी करण्याचे आदेश काही बँकांना दिले आहेत. जळगाव जिल्हा बँकेलादेखील हे आदेश महिनाभरापूर्वी प्राप्त झाले होते. त्यानुसार जिल्हा बँकेकडून आपल्या १२ लाख खातेदारांचे खाते क्रमांक महिनाभरात टप्प्याटप्प्याने बदलविण्यात आले आहेत. खाते बदलविल्यानंतर याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्याची गरज होती. मात्र, ही माहिती जिल्हा बँकेने न दिल्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
पीक विम्यासाठी दिला जुना खाते क्रमांक
शेतकऱ्यांकडून खरीप पीक विम्याची रक्कम भरण्यात आली आहे. २३ जुलैपर्यंत ही रक्कम भरण्याची मुदत होती. मात्र, आता हा विमा काढताना अनेक शेतकऱ्यांनी आपला जुना खाते क्रमांक विम्याचा अर्जावर टाकला आहे. त्यामुळे भविष्यात जी नुकसानभरपाईची रक्कम मिळेल ती रक्कम शेतकऱ्यांचा खात्यावर पडेल की नाही? याबाबत शेतकरी साशंक आहेत. जर ही रक्कम पडलीच नाही तर ? यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानदेखील होण्याची शक्यता आहे.
डिजिटल युगात जिल्हा बँकेची पिछाडी
आजचे युग हे डिजिटल युग समजले जाते. बँकेतील कोणताही लहान-मोठा व्यवहार झाल्यावरदेखील खातेदारांच्या मोबाईल त्याबाबत प्रत्येक बँक त्याबद्दलचा संदेश पाठवीत असते. मात्र, खातेदारांचे खाते क्रमांक बदलवले गेले असतानादेखील जिल्हा बँकेने त्याबाबत कोणताही संदेश शेतकऱ्यांचा मोबाईलवर पाठविला नाही.
माहिती देण्याची जबाबदारी सोपविली विविध शाखांवर
जिल्हा बँकेने खाते क्रमांक बदलवल्याची माहिती ही शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे न देता विविध शाखांवर ही जबाबदारी सोपविली आहे. जिल्हा बँकेच्या ज्या जिल्हाभरात विविध शाखा आहेत. त्या शाखांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्या शाखेच्या बाहेर नोटीस लावून व येणाऱ्या खातेदाराला प्रत्यक्षात ही माहिती देण्याचा सूचना जिल्हा बँकेने दिल्या आहेत. मात्र, जर शेतकरी शाखेवर आलाच नाही तर अशा शेतकऱ्यांना खाते क्रमांक बदलल्याची माहिती कशी देणार? या प्रश्नावर बँक प्रशासन मात्र चुप्पी साधून आहे.
कोट..
जिल्हा बँकेने आपल्या १२ लाख खातेदारांच्या खाते क्रमांकात बदल केले आहेत. याबाबत आरबीआयकडून निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक
जिल्हा बँक प्रशासनाच्या बेपर्वाईचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खातेदारांचे खाते क्रमांक बदलविण्यात आले. त्याची साधी कल्पना देखील शेतकऱ्यांना बँक प्रशासनाने दिली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा व्यवहारावर परिणाम झाला असून, याबाबत जिल्हा बँकेचे ढिसाळ नियोजन समोर येत आहे.
- विकास पवार, जिल्हा समन्वयक, राष्ट्रवादी काँग्रेस