पातोंडा येथील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 23:29 IST2020-10-12T23:28:51+5:302020-10-12T23:29:16+5:30
एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाचा पुण्यात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० रोजी रात्री घडली.

पातोंडा येथील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू, एक गंभीर
पातोंडा, ता.अमळनेर : येथील एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाचा पुण्यात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० रोजी रात्री घडली. विनोद देवराम सोनवणे(२३)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र गंभीर आहे.
येथील संत रोहिदास चौकातील रहिवाशी देवराम त्र्यंबक सोनवणे यांचा मुलगा विनोद हा दीड महिन्यापूर्वी भोसरी-पुणे येथे गेला होता. तेथे तो एका कंपनीत कामाला पण लागला. तसेच तो इतर वेळी अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय पण करायचाअसे समजते. दि.१०च्या रात्री विनोद व त्याचा मित्र हर्षल मोरे हे दोन्ही जेवण करण्यासाठी दुचाकीने बाहेर पडले. त्यावेळी एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. तेव्हा अपघात होऊन विनोदाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मित्र हर्षल हा गंभीर जखमी अवस्थेत असून त्याचेवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्याचा मोठा भाऊ योगेश याने दिली. विनोदचा मृतदेह दि.११ रोजी रात्री पुण्याहून पातोंडा येथे आणण्यात आला. रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब असून, आई-वडील मोलमजुरी करून पोटाची खडगी भरतात.