जळगावच्या भाविकांचा अपघात, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:44+5:302021-08-25T04:21:44+5:30
रावेर/ पाल : श्रावण सोमवारनिमित्त मध्य प्रदेशातील शिरवेलच्या महादेवाचे दर्शन घेऊन येणाऱ्या जळगावातील भाविकांच्या मालवाहू वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ...

जळगावच्या भाविकांचा अपघात, दोन ठार
रावेर/ पाल : श्रावण सोमवारनिमित्त मध्य प्रदेशातील शिरवेलच्या महादेवाचे दर्शन घेऊन येणाऱ्या जळगावातील भाविकांच्या मालवाहू वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन झाडावर आदळून दोन युवक ठार झाले, तर नऊजण जखमी झाले. पालजवळ वनविभागाच्या तपासणी नाक्याच्या पुढे थोड्या अंतरावर हा भीषण अपघात २३ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास झाला.
या दुर्घटनेबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव येथील कांचननगर भागातील दहा युवक श्रावण सोमवार निमित्ताने चालकासह मध्य प्रदेशातील शिरवेलच्या महादेवाच्या दर्शनासाठी छोट्या मालवाहू वाहनाने (एम.एच.- १९/सी.वाय- ५३१५) गेले होते. दरम्यान, तिकडून पालमार्गे परत येत असताना चालक विक्की अरुण चौधरी (वय २५, रा कांचननगर, जळगाव) हा बेदरकारपणे वाहन चालवत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटून भरधाव वेगातील वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळून उलटल्याने त्यात बसलेले गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (३६, दोन्ही रा. कांचननगर, जळगाव) हे जागीच ठार झाले, तर त्या मालवाहू वाहनातील भूषण दिलीप सपकाळे (२६), अजय सुनील वाल्हे (२१) , गणेश रवींद्र सोनवणे (२३) , परेश निंबा सोनवणे (२६) , चेतन रवींद्र मोरे (२३), पवन रवींद्र मोरे (२२) , महेश गोविंदा चौधरी (२१) , गजानन रमेश पाटील (२४) व चालक विक्की अरुण चौधरी (२५, सर्व रा. कांचननगर, जळगाव) असे नऊजण दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात पाल वनविभागाच्या तपासणी नाक्याच्या पुढे अर्धा कि.मी. अंतरावर झाला.
या अपघाताची खबर मिळताच पाल दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड, पो.कॉ. नरेंद्र बाविस्कर, पो.कॉ. दीपक ठाकूर, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, फौजदार अनिस शेख, फौजदार मनोज वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.
दरम्यान, मृत गोलू बंडू परदेशी (२६) व प्रशांत साहेबराव तांदूळकर (३६) यांच्या मृतदेहांचे रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले.
जखमींपैकी भूषण दिलीप सपकाळे (२६) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये वाहनचालक विक्की अरुण चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख तपास करीत आहेत.