पहूरला वाघूर नदीपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:20 IST2019-12-18T22:20:03+5:302019-12-18T22:20:09+5:30
महामार्गाची स्थिती : बैलाचा पाय अडकल्याने अपघात

पहूरला वाघूर नदीपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात
पहूर, ता.जामनेर : येथील जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीवर असलेल्या पुलावर जागोजागी खड्डे पडले असून एका भगदाडात बैलाचा पाय अडकल्याने बैल जागेवर अडला. याच दरम्यान आलेल्या अज्ञात वाहनाने या बैलाला धडक दिल्याने बैल गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.
जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीवर पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे जीर्ण झाले आहेत. तर पुलाच्या मधोमध खड्डेच खड्डे पडले असून एका ठिकाणी भगदाड पडले आहे. यात बुधवारी बैलाचा पाय अडकल्याने बैलाला रस्त्यातून हलता आले नाही. जखमी बैलाला माजी उपसरपंच अशोक सुरवाडे, पेठ ग्रामपंचायत कर्मचारी शरद नरवाडे, विशाल पाटील, भगवान न्हावी आदींनी बैलाला रस्त्याच्या बाजूला आणून पशुसंवर्धन कर्मचारी अशोक जाधव यांनी जखमी बैलावर उपचार केले आहे. दिवसेंदिवस पूल धोकादायक होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.