हरितालिका पूजा साहित्य खरेदीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:07+5:302021-09-09T04:22:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अखंड सौभाग्यासाठी करण्यात येणाऱ्या हरितालिका व्रताच्या खरेदीसाठी बुधवारी सकाळपासून बाजारपेठेत चांगलीच लगबग दिसून आली. ...

हरितालिका पूजा साहित्य खरेदीची लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अखंड सौभाग्यासाठी करण्यात येणाऱ्या हरितालिका व्रताच्या खरेदीसाठी बुधवारी सकाळपासून बाजारपेठेत चांगलीच लगबग दिसून आली. पूजा साहित्यासह फळे, उपवासाच्या पदार्थांना चांगलीच मागणी होती.
कुमारिकांना सुयोग्य वर मिळावा व विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य, आरोग्य, सुख समृद्धी, संपत्ती प्राप्त व्हावी, तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी करण्यात येणाऱ्या हरितालिका व्रतासाठी आवश्यक पूजा साहित्य, बेलपत्री, पाने, फुले यांची दुकाने शहरातील विविध भागात लागली होती. याच्या खरेदीसाठी महिलांची सकाळपासून लगबग सुरू होती. सकाळी पाऊस नसल्याने अनेकांनी सकाळीच बाजारपेठेत जाऊन विविध साहित्य खरेदी केले. २० रुपयाला सर्व पाने, फुले, बेलफूल असा दर यावेळी होता. या सोबतच १० रुपयांनी पूजेची पुडी व पाच फळे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
राजगिऱ्याच्या लाडूला वाढली मागणी
हरितालिकेचे व्रत करताना मीठ, तिखट खाणे टाळले जाते. यासाठी राजगिऱ्याला अधिक पसंती असते. त्यानुसार बाजारपेठेत राजगिऱ्याचे लाडू मोठ्या प्रमाणात आले होते, तसेच कॉलनी भागातही विकणाऱ्यांची संख्यादेखील मोठी होती. १० रुपयांना एक पाकीट याप्रमाणे त्यांची विक्री झाली.
हरितालिका मूर्तींना मागणी
हरितालिका व्रताला वाळूपासून शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. असे असले तरी शिवलिंगासोबतच हरितालिका मूर्तीदेखील बाजारपेठेत उपलब्ध होत्या. त्यांचीही महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
मागणी वाढूनही फळे नियंत्रणात
पूजेसाठी तसेच उपवासासाठी विविध फळांची महिलांकडून खरेदी करण्यात आली. पूजेत पाच फळे लागणार म्हणून काहींनी कच्च्या व छोट्या फळांची खरेदी केली तर अनेकांनी नियमित विक्री होणाऱ्या फळांची खरेदी केली. या सोबतच उपवासासाठीदेखील केळी, सफरचंद, डाळिंब यांना चांगली मागणी होती. असे असले तरी केळी ३० रुपये प्रति डझन तर सफरचंद ६० ते ७० रुपये प्रति किलोने विक्री झाले.