जळगावचा तरुण ठरला सेक्सटॉर्शनचा बळी, अश्लिल व्हिडीओकॉल व्हायरल करण्याची धमकी
By सुनील पाटील | Updated: October 11, 2022 15:40 IST2022-10-11T15:34:14+5:302022-10-11T15:40:03+5:30
रेकॉर्डींग व फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जळगावचा तरुण ठरला सेक्सटॉर्शनचा बळी, अश्लिल व्हिडीओकॉल व्हायरल करण्याची धमकी
जळगाव : शहरातील ४० वर्षीय तरुणाला तरुणीने व्हिडीओकॉलवर अश्लिल कृत्य करुन त्याचे रेकॉर्डींग करुन घेतलं. तसंच हे रेकॉर्डींग व फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेक्सटॉर्शनचा हा प्रकार असून गेल्या सात महिन्यातील ही तिसरी घटना आहे.
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, खासगी नोकरी करणाऱ्या या तरुणाला ८ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून या तरुणाशी मेसेंजरवर संवाद साधला. त्यानंतर तरुणाचा व्हाटसॲप नंबर मिळविला. त्यानंतर या तरुणाला एकांतात जाऊन कपडे काढायला लावले. दोघांचे अश्लिल व्हिडीओ रेकॉर्डींग करुन ही रेकॉर्डींग सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली.
बदनामी होऊ द्यायची नसेल तर २० हजार रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या या तरुणाने दोन दिवस कुठेच वाच्यता केली नाही. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी रात्री अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.