जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी धाव घेत टाळला अनर्थ!
By आकाश नेवे | Updated: September 23, 2022 16:34 IST2022-09-23T16:33:57+5:302022-09-23T16:34:42+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲम्ब्युलन्स मालक धीरज अशोक कासोदे याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी धाव घेत टाळला अनर्थ!
जळगाव : चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव, महात्मा फुले आरोग्य संकुल येथे कोविड काळात काम केलेल्या ॲम्ब्युलन्सचे भाडे शासनाकडे थकीत आहे. अद्यापही हे भाडे मिळालेले नाही. त्यामुळे थकीत बिलाची रक्कम १५ लाख ५१ हजार ४०० मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲम्ब्युलन्स मालक धीरज अशोक कासोदे याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कोविड १९ च्या काळात कासोदे याच्या मालकीच्या तीन ॲम्ब्युलन्स २१ ऑक्टोबर २०२० ते ७ ऑक्टोबर २०२१ या काळात शासकीय सेवेत होत्या. मात्र, या ॲम्ब्युलन्सचे १५ लाख ५१ हजार ४०० रुपयांचे भाडे शासनाकडे अद्यापही थकीत आहे. हे पैसे शासनाकडून अद्यापही धीरज कासोदे याला मिळालेले नाहीत. त्याबाबत त्याने वारंवार बिलांची रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती.
तसेच वेतन न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारादेखील दिला होता. त्यानुसार त्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगावर डिझेल ओतून घेतले. त्याला तातडीने जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचा जीव वाचविला. त्याला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.