भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार
By संजय पाटील | Updated: September 23, 2022 20:51 IST2022-09-23T20:51:09+5:302022-09-23T20:51:20+5:30
हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली.

भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार
अमळनेर जि. जळगाव : शिरपूरकडून येणाऱ्या बसने दुसऱ्या बसला ओव्हरटेक केल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पांझरा नदी पुलाजवळ घडली. महेंद्र शांतीलाल बोरसे (३९, रा.पाडसे ता. अमळनेर) व अरुण उर्फ शंकर नथ्थू साळुंखे (३८, रा. हिंगोणे खुर्द प्र. जळोद ता. अमळनेर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली.
शुक्रवारी दुपारी शिरपूर -अमळनेर ही बस पांझरा नदी पूल ओलांडून अमळनेर हद्दीत आली होती. त्याचवेळी एका हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील महेंद्र बोरसे व अरुण साळुंखे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
महेंद्र हा अमळनेर येथे भाड्याने राहत होता. मोंढाळे, बहादरपूर (ता. पारोळा) येथे त्याचा दवाखाना होता. त्याच्या पश्चात आई, वडील,भाऊ ,पत्नी व मुलगा असा परिवार आहे. अरुण हा बांभोरी (ता. धरणगाव) येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होता. त्याच्या पश्चात वडील,भाऊ ,पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. याबाबत बसचालकाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.