सहकार विभागाच्या बैठकीला येणाऱ्या सचिवाला ट्रकने चिरडले
By विजय.सैतवाल | Updated: August 22, 2023 14:57 IST2023-08-22T14:56:13+5:302023-08-22T14:57:16+5:30
हा अपघात मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला.

सहकार विभागाच्या बैठकीला येणाऱ्या सचिवाला ट्रकने चिरडले
जळगाव : जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाच्या बैठकीसाठी दुचाकीवर येणारे कोल्हाडी, ता. बोदवड विका सोसायटीचे सचिव पंजाबराव नामदेन बोरसे (५२, रा. बोदवड) यांना दुचाकीने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच १९, एसी २२४) जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले त्या वेळी तेथे मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०४, जेयु ९५९६) त्यांना धडक दिली.
यात बोरसे चाकाखाली आले व त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली व पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी रुग्णावाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला.