जळगाव शहरातील ९५६ जणांना तापासह सर्दी, श्वास घेण्यास होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:02 PM2020-06-25T13:02:48+5:302020-06-25T13:03:18+5:30

मनपा पथकाचे सर्वेक्षण

956 people in Jalgaon city are suffering from fever, cold and difficulty in breathing | जळगाव शहरातील ९५६ जणांना तापासह सर्दी, श्वास घेण्यास होतोय त्रास

जळगाव शहरातील ९५६ जणांना तापासह सर्दी, श्वास घेण्यास होतोय त्रास

Next

जळगाव : मनपाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील ३ लाख ९४ हजार ६६३ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ९५६ जणांना तापासह सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार महापालिके च्या वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून मनपा रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून, घरातच देखरेखखाली ठेवले आहे. तर ११ जणांचे कोरोनाच्या शंकेवरून स्वॅब घेण्यात आल्याची माहिती मनपा वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ.राम रावलाणी यांनी दिली.
कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आता सर्वेक्षणावर अधिक भर दिला आहे. प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी व त्यांच्या लक्षणांची माहिती घेऊन मनपा रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. तसेच रुग्णांना देखरेखीखाली ठेवून तीन ते चार दिवसात रुग्णांच्या लक्षणात वाढ दिसल्यास त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात नियमितच्या तपासणीसह दररोजच्या सर्वेक्षणाची मोहीमदेखील सुरू ठेवण्यात आली आहे.
रुग्ण आढळण्याआधीच उपाययोजना करण्यावर भर
आतापर्यंत शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर मनपाच्या पथकाकडून रुग्णाचे घर व परिसर सील केला जात होता. मात्र, शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाकडून आता रुग्ण आढळण्याआधीच उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वेक्षण केल्यानंतर त्यात ९५६ जणांना ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे आढळून आले. त्यात ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना हायरिस्कमधून ठेवून, दोन दिवसात त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.
प्रतिबंधित क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करणार
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रांचीही संख्या वाढत आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रांमधून अनेकजण बाहेर पडतात. आता महापालिकेकडून जास्तीत जास्त यंत्रणा प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असून, वयोमानानुसार सर्वेक्षणदेखील केले जाणार आहे.
वृध्द नागरिकांवर असणार लक्ष
मनपाकडून सर्वेक्षणात शहरातील दाटवस्ती व झोपडपट्टी भागातील सुमारे १ लाख ७० हजार नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहेत. त्यात ५० वर्षाच्यावरील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २७०० नागरिकांना विविध आजार व व्याधींनी ग्रासले आहे, अशा नागरिकांचे दोन टप्प्यात शनिवार व बुधवार या दोन दिवशी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या शरीरातील तापमान व आॅक्सीजनचे प्रमाण तपासले जाणार असल्याची माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
महापालिकेकडून ४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. विविध वयोगटातील विभागणी करून, काही लक्षणे असलेल्यांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. मनपा वैद्यकीय विभागाकडून तपासणी घेण्याचे काम सुरू आहे. दाट वस्तीच्या भागातदेखील सर्वेक्षण करून झाले आहे.
-सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त

Web Title: 956 people in Jalgaon city are suffering from fever, cold and difficulty in breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव