अनुसूचित जमातीतील ८४ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळणार उपस्थिती भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST2021-03-01T04:18:04+5:302021-03-01T04:18:04+5:30

जळगाव : सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा उपस्थिती भत्ता मिळणार की नाही, ...

84,000 students from Scheduled Tribes will get attendance allowance | अनुसूचित जमातीतील ८४ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळणार उपस्थिती भत्ता

अनुसूचित जमातीतील ८४ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळणार उपस्थिती भत्ता

जळगाव : सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा उपस्थिती भत्ता मिळणार की नाही, अशी स्थिती असताना जिल्ह्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८४ हजार ७२२ विद्यार्थ्यांना हा भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यासाठी ११ कोटी ४८ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा निधी शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाला आहे.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये व जे गरजू आहे त्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने शालेय शिक्षण विभाग व सरकारच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्तादेखील मिळावा, यासाठी आदिवासी विभागाच्यावतीने योजना राबविली जाते. यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी उपस्थिती भत्ता दिला जातो.

उपस्थिती नाही, भत्ता द्यावा कसा?

सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जे विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे, त्यांना उपस्थिती भत्ता दिला जातो. मात्र कोरोनामुळे गेल्या ११ महिन्यांपासून शाळाच बंद आहे. मध्यंतरी टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्या खऱ्या मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्या देखील पुन्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीच नाही, भत्ता द्यावा कसा?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तर सुरूच आहे, त्यामुळे त्यांना हा भत्ता दिला जावा, असे सूचविण्यात आल्याने आता हा निधी उपलब्ध झाला आहे.

८४,७२२ विद्यार्थ्यांना मिळणार भत्ता

जिल्ह्यातील ८४ हजार ७२२ विद्यार्थ्यांसाठी ११ कोटी ४८ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. यात जिल्ह्यासाठी मिळणारा निधी दोन वर्गवारीत मिळतो. जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा हे आदिवासी बहुल तालुके असल्याने या भागातील विद्यार्थ्यांसाठी यंदा ६६ लाख १६ हजार ५०० रुपये तर उर्वरित १२ बिगर आदिवासी तालुक्यांसाठी १० कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

असा मिळतो भत्ता

या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता दिला जातो. यात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्रति विद्यार्थी वार्षिक एक हजार रुपये, इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत प्रति विद्यार्थी वार्षिक एक हजार ५०० रुपये, इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत प्रति विद्यार्थी वार्षिक दोन हजार रुपये असा भत्ता दिला जातो.

लवकरच वितरण

निधी प्राप्त झाल्याने प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळावा म्हणून त्याचे लवकरच वितरण सुरू होणार आहे. एक ते दोन महिन्यात सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जे विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे, त्यांना उपस्थिती भत्ता दिला जातो. कोरोनामुळे हा भत्ता द्यावा की नाही, अशी चर्चा होती. मात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तर सुरूच आहे, त्यामुळे त्यांना हा भत्ता दिला, जावा असे सूचविण्यात आल्याने आता हा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचे लवकरच वितरण सुरू होईल.

- बी.एस. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

काय म्हणता विद्यार्थी

दरवर्षी आम्हाला उपस्थिती भत्ता दिला जातो. तो या वर्षी मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. शिक्षण तर सुरूच आहे, हा भत्ता मिळावा, हीच अपेक्षा.

- रोशनी बारेला.

कोरोनामुळे शाळा बंद आहे, असे सांगत आम्हाला यंदा उपस्थिती भत्ता मिळणार नाही, असे सांगत आहे. मात्र हा भत्ता मिळाल्यास मोठा आधार होतो. तो लवकर मिळावा.

- संतोष चव्हाण

Web Title: 84,000 students from Scheduled Tribes will get attendance allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.