जळगाव : मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात टप्याटप्याने ७१७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
१० सप्टेंबर २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यात ३१ ऑगस्टला या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.
७७ डॉक्टर्स
३८६ परिचारिका
३३ तंत्रज्ञ
२२१ इतर कर्मचारी
अचानक रस्त्यावर आलो : कंत्राटी कक्ष सेवक
कोरोना रुग्णांच्या जवळ त्यांचे रक्ताचे नातेवाईकसुद्धा जात नव्हते. अशा भयावह परिस्थितीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शासकीय रुग्णालयात अल्प मानधनावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा केली; परंतु कोरोना रुग्णसंख्या कमी होताच शासनाने या खऱ्या कोरोना योद्धयांना कामावरून कमी केले. वास्तविक राज्यातील आरोग्य विभागांत अनेक पदे रिक्त असल्याने या कोरोना योद्ध्यांना सेवेत सामावून घेणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे शिवाय या अचानक कार्यमुक्त केल्याने अनेक कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.
- नीलेश बोरा, कंत्राटी कक्षसेवक
यंत्रणेवर परिणाम नाही
कंत्राटी कर्मचाऱ्यांची केवळ कोविडसाठी नियुक्ती केली होती. सध्या कोविड पूर्णत: नियंत्रणात असून केवळ मोहाडी येथे कोविड सेंटर आहे. अन्य जिल्हाभरात नॉन कोविड यंत्रणा असून त्यासाठी नियमितचे मनुष्यबळ आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्योन सध्यातरी यंत्रणेवर कसलाच परिणाम नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
शासनाच्या आदेशानुसारच ही कंत्राटी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती आणि शासनाकडून आदेश आल्यानंतर ३१ ऑगस्टला कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोविडबाधितांची संख्या नियंत्रित आहे. त्यामुळे केवड मोहाडी हेच केंद्र सुरू असून त्याठिकाणी आवश्यक तेवढे मनुष्यबळ आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी नॉन कोविड यंत्रणा आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक