जळगावात वकीलाच्या बंगल्यातून लांबविला 66 हजाराचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:16 IST2017-08-23T13:12:21+5:302017-08-23T13:16:25+5:30
गणेशपुरीत घरफोडी : 13 दिवसांपासून बंद होता बंगला

जळगावात वकीलाच्या बंगल्यातून लांबविला 66 हजाराचा ऐवज
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23 - औरंगाबाद खंडपीठात वकील असलेल्या नजम ए. देशमुख यांच्या जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील गणेशपुरी येथील बंगल्याचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 24 ग्रॅम सोन्यासह 3 हजार 600 रुपये रोख असा 66 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अॅड.देशमुख यांच्या आई 10 ऑगस्ट रोजी मुंबई येथे गेलेल्या असल्याने त्या दिवसापासून बंगल्याला कुलुप होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेहरुणमधील गणेशपुरी भागात प्लॉट क्रमांक 13 मध्ये अॅड. नजम देशमुख यांचा ‘रुहुम’ बंगला आहे. अॅड.देशमुख हे औरंगाबादला खंडपीठात वकीली व्यवसाय करत असल्याने ते तेथेच वास्तव्याला आहेत तर वडील एहतेशामोद्दीन देशमुख यांचे निधन झाल्याने आई नफीसा नाहीद एकटय़ाच या बंगल्यात राहत होत्या. मुलगा औरंगाबादला तर मुलगी रुही देशमुख मुंबईला राहत असल्याने आई या अधूनमधून दोघांकडे जात असतात. 10 ऑगस्ट रोजी आई या मुंबई येथे मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे बंगल्याला कुलुप होते.
नफीसा वाहेद देशमुख यांच्या नावाने कुरीअरचे पार्सल घेऊन एक व्यक्ती बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या घरी गेला होता. दरवाजा उघडा असतानाही घरातून कोणीच प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे कुरीअरचा कर्मचारी शेजारी असलेल्या सुलोचना रवींद्र पाटील यांच्याकडे गेला. देशमुख यांचे घर उघडे आहे, मात्र आवाज देऊनही कोणीच प्रतिसाद देत नाही, त्यामुळे हे पार्सल तुम्ही घ्या व नंतर त्यांना द्या असे त्याने सांगितले. त्यावर सुलोचना पाटील यांनी नफीसा यांना फोन केला असता मी मुंबईत आहे, जळगावच्या घरी कोणीच नाही असे नफीसा यांनी सांगितले असता मग घर कसे उघडे असा प्रश्न करुन त्यांनी घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले.
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर नफीसा यांनी मुलाचा मित्र असलेले अॅड.रहिम पिंजारी यांना फोन करुन घरी पाठविले. त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक समाधान पाटील, कॉन्स्टेबल भरत लिंगायत व अशरफ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बंगल्यातील चारही खोल्यांमधील कपाटे फोडलेली व त्यातील सामान बाहेर फेकलेला आढळून आला.