आधारला पॅन लिंक नसेल तर सरकारला ५२ हजार कोटी लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:48 IST2023-07-02T07:48:01+5:302023-07-02T07:48:18+5:30
५२ कोटींपेक्षा जास्त रिटर्नपासून लांब

आधारला पॅन लिंक नसेल तर सरकारला ५२ हजार कोटी लाभ
-विजयकुमार सैतवाल
जळगाव : वारंवार मुदतवाढ देऊनही आधार व पॅन कार्ड लिंक न करणाऱ्या नागरिकांच्या निष्काळजीपणाचा फायदा शासनाला होणार आहे. आयकर विभागाकडे एकूण नोंदणी झालेल्या करदात्यांपैकी एक कोटी ४७ लाख ७१ हजार ९८६ जणांनी आधार-पॅन कार्ड लिंक केलेले नाही, तर ज्या ५२ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे आधार-पॅन कार्ड लिंक आहे, मात्र ते आयकर रिटर्न भरण्यापासून अजूनही लांब आहेत. त्यामुळे या सर्वांना किमान एक हजार रुपये जरी कर लागला तरी सरकारी तिजोरीत ५२ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पडणार आहे.
कर चुकवेगिरी व बुडणारा सरकारी महसूल रोखण्यासाठी सरकारने आधार व पॅन कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३० जून २०२३ ही अंतिम मुदत होती. देशातील एकूण ११ कोटी १७ लाख ७१ हजार ९८६ जणांनी आयकर खात्याकडे आयकर रिटर्नची नोंदणी केलेली आहे; मात्र त्यापैकी ९ कोटी ७० लाख जणांचे आधार-पॅन लिंक आहे. उर्वरित एक कोटी ४७ लाख ७१ हजार ९८६ जणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड लागून त्यातूनही कोट्यवधींचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होऊ शकतो.