पारोळा तालुक्यात चिकनगुनियासदृष आजाराची 45 जणांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:40 IST2017-11-10T19:37:08+5:302017-11-10T19:40:55+5:30
वाघरा- वाघरी गावातील गोपाळवाडीत गुरूवारी सकाळपासून चिकनगुनियासदृष आणि डेंग्यूची लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरल्याने तब्बल 45 रुग्णांना रात्रीपासून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले.

पारोळा तालुक्यात चिकनगुनियासदृष आजाराची 45 जणांना लागण
लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.10 : तालुक्यातील वाघरा- वाघरी या गावातील गोपाळवाडी या भागात चिकनगुनियासदृष्य आणि डेंग्यू आजाराची लागण झाल्याने 45 जणांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात अनेक स्त्रियांसह लहान बालकांचाही समावेश आहे. या रुग्णांवर उपचारासाठी जळगाव येथून आरोग्य पथक पारोळ्यात दाखल झाले आहे. दरम्यान, आमदार डॉ. सतीश पाटील आणि माजी आमदार चिमणराव पाटील यांनी रूग्णालयात भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. 9 रोजी सकाळपासून गावातील काही जणांना थंडी, ताप येऊन त्यांचे हातपाय गळून गेल्यासारखे झाले. त्यांना चालता फिरता येत नव्हते. अशक्तपणा वाटू लागल्याने त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावात हा आजार पसरल्याने रात्रीतून अनेक रुग्णांना दाखल करण्यात आले. पहाटेर्पयत ही संख्या 45 वर जाऊन पोहचली. रुग्णालयात गर्दी वाढल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा:यांची धावपळ सुरू झाली. त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. नंतर जळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा:यांचे पथकही पारोळ्यात दाखल होऊन त्यांनी उपचार सुरू केले. दरम्यान, वाघरा- वाघरी येथील आजाराच्या लागणचे वृत्त समजताच आमदार डॉ. सतीश पाटील यांनी कुटीर रुग्णालय गाठत रुग्णांची विचारपूस केली. तसेच जिल्हा शल्य चिकित्सांशी संपर्क साधत उपचारासाठी कॅम्प लावण्याची सूचना केली. यावेळी त्यांनी रुग्णांना आर्थिक मदतही केली. तसेच माजी आमदार चिमणराव पाटील यांनीही रुग्णांची विचारपूस करीत आर्थिक मदत केली. आरोग्य पथकाने घेतले नमुने दरम्यान, आरोग्य पथकाने वाघरा- वाघरी गावात जाऊन गोपाळवाडीतील पाण्याचे नमुने, जलद ताप संरक्षण उपाय योजून रुग्णाचे रक्त नमुने घेतले आणि ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.