जळगावात डेंग्यूने घेतला ४ वर्षांच्या बालिकेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:52 IST2018-09-07T15:50:17+5:302018-09-07T15:52:37+5:30
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली.

जळगावात डेंग्यूने घेतला ४ वर्षांच्या बालिकेचा बळी
जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली.
दोन दिवसांपासून आजारी असलेल्या जान्हवीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे ५ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर जागे झालेल्या मनपा प्रशासनाकडून ८० कर्मचाऱ्याद्वारे शिवाजीनगर परिसरात अबेटिंग, फवारणी व धुरळणीच्या उपाययोजना करण्यात आल्या.
डेंग्यूने पसरले हातपाय
गेल्या महिनाभरापासून शहरात डेंग्यूने पाय पसरायला सुरुवात केली आहे. भोईटेनगरातदेखील एका सात वर्षीय मुलाला डेंग्यू झाला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने केलेल्या पाहणीत २७ रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने बाधित असल्याचे आढळून आले होते. मनपाने त्यापैकी दहा रुग्णांचे नमुने औरंगाबादला तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यातदेखील ५ रुग्णांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले होते.
जान्हवीवर सकाळी ११ वाजता झाले अंत्यसंस्कार
जान्हवी ही बालवाडीत शिकत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. तिला जळगावातील खासगी रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना तिचा गुरुवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. वडील प्रशांत पाटील हे विमा क्षेत्रात काम करतात, तर आई घरकाम करते. सकाळी ११ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
६० डेंग्यूसदृश रुग्ण आढळले
शहरात दिवसेंदिवस डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मलेरिया विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणनुसार सुमारे ६० डेंग्यू संशयित तापाच्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती मलेरिया विभागाचे सुनील पांडे यांनी दिली. यामुळे डेंग्यूचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे. मनपाने खबरदारी म्हणून मनपाच्या प्रत्येक रुग्णालयात औषधीचा पुरवठा सुरू केला असून, अबेटिंग व फवारणीचे काम नियमित सुरू आहे. डेंग्यूमुळे गेल्या वर्षी शहरात १२ जणांचा मृत्यू झाला होता.