मध्य रेल्वेची भंगारातून ३९१ कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:23+5:302021-08-19T04:22:23+5:30
भुसावळ : मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने "झिरो स्क्रॅप ...

मध्य रेल्वेची भंगारातून ३९१ कोटींची कमाई
भुसावळ : मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने "झिरो स्क्रॅप मिशन" सुरू केले आहे. कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि ३९१.४३ कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, ते गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे.
वर्ष २०२१-२२ चे लक्ष्य ४०० कोटी रुपये आहे. या स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे साहित्य, निरूपयोगी (भंगार) डबे, वॅगन आणि इंजिन (लोकोमोटिव्ह) इत्यादींचा समावेश आहे. मध्य रेल्वेने ८.६५ कोटी रुपयांच्या कमाईसह ई -ऑक्शनद्वारे "जसे आहे तिथे आहे" तत्त्वावर वापरात नसलेल्या संरचनांची विल्हेवाट लावली आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले की, रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल. या आर्थिक वर्षात, रेल्वे लाभार्थ्यांच्या उपचार/काळजीसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, ऑक्सिजन जनरेटर प्लांटसह कोविड वस्तूंच्या खरेदीची व्यवस्था करण्याबरोबरच रेल्वे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यात साहित्य व्यवस्थापन शाखेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.