गिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:16 IST2019-09-26T13:16:04+5:302019-09-26T13:16:40+5:30
धरणाचे सहा दरवाजे उघडले

गिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गुरुवारी सकाळी २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठालगत असणा-या गावांना सतर्कतेच्या सुचना दिल्या असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांनी 'लोकमत'ला दिली.
गिरणा धरणाचे हे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. १९६९ मध्ये ते पहिल्यांदा १०० टक्के भरले. यानंतर तब्बल ११ वर्षांनी म्हणजेच २००७ नंतर यावर्षी नव्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात परतीच्या पावसाचे धूमशान सुरु असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.
बुधवारी सायंकाळी पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. रात्री पाण्याची आवक वाढल्याने शुक्रवारी सकाळी १५ हजार क्युसेस पर्यंत विसर्ग वाढविला गेला. सकाळी ११ वाजेपासून २० हजार क्युसेस एवढा विसर्ग सुरु केला गेला आहे.