महापालिकेच्या अनास्थेमुळे परत जाणार ३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:24+5:302021-09-16T04:22:24+5:30

तीन दिवसांच्या आत निधी परत द्या : जिल्हा प्रशासनाचे मनपाला पत्र लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे निधी नसल्याचे ...

3 crore fund will be returned due to NMC's apathy | महापालिकेच्या अनास्थेमुळे परत जाणार ३ कोटींचा निधी

महापालिकेच्या अनास्थेमुळे परत जाणार ३ कोटींचा निधी

तीन दिवसांच्या आत निधी परत द्या : जिल्हा प्रशासनाचे मनपाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे निधी नसल्याचे कारण देत नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या महापालिकेला दोन वर्षांत शासकीय निधी खर्च करता आला नसल्याने ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी आता शासनाने जमा करण्याचे आदेश काढले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेने मनपा प्रशासनाला पत्र पाठवून तीन दिवसांच्या आत हा निधी नगरपालिका शाखेकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात येणारी कामे मनपा प्रशासनाला निर्धारित वेळेत न करता आल्याने अनेक महिन्यांपासून मनपाकडे अखर्चित म्हणून पडून असलेला ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी परत शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत कामे पूर्ण करून कामांचा पूर्ण निधी दोन वर्षांचा कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव मनपा दोन वर्षांत निधी खर्च न करू शकल्याने खर्च न केलेले ३ कोटी २८ लाख शासनाने परत मागितले आहेत. महानगरपालिकेला २०१५ ते २०१९ या कालावधीत जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीपैकी ३ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. ज्यात जिल्हा नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना व दलित वस्ती सुधार योजना या योजनांचा समावेश आहे.

मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड

महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून शहरातील कामांचे नियोजन करताना मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. घनकचरा प्रकल्प, अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, शिवाजीनगर उड्डाणपूल, एलईडी योजना असो की शहरातील साफसफाईच्या ठेक्याचे काम, अशा सर्वच योजनांमध्ये मनपा अधिकाऱ्यांचा चुकांचा प्रताप समोर येत आहे. आता पुन्हा शासनाने दिलेला निधी मनपा प्रशासनाला खर्चदेखील करता आलेला नसल्याने मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

Web Title: 3 crore fund will be returned due to NMC's apathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.