केंद्र प्रमुखांची २८, तर विस्तार अधिकाऱ्यांची १९ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:42+5:302021-07-15T04:13:42+5:30
शिक्षण विभागात प्रभारीराज : तक्रारींचा निपटारा वेळेत होत नसल्याच्या तक्रारी सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोनामुळे ...

केंद्र प्रमुखांची २८, तर विस्तार अधिकाऱ्यांची १९ पदे रिक्त
शिक्षण विभागात प्रभारीराज : तक्रारींचा निपटारा वेळेत होत नसल्याच्या तक्रारी
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे शिक्षण विभागातील पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून, अनेक शिक्षक, पालकांच्या तक्रारींचा निपटाराही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. जळगाव जिल्ह्यात केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व ग्रेडेड मुख्याध्यापकांच्या एकूण ३४५ जागा रिक्त असून या जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी होत आहे.
शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, अधीक्षक यांसह इतर विविध पदे शासनाने निर्माण केली आहेत. परंतु, जळगाव जिल्ह्यात केंद्र प्रमुखांच्या मंजूर ४९ पैकी २८ पदे रिक्त आहेत. हा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. विस्तार अधिकाऱ्याची (वर्ग ३, श्रेणी २) १० पदे रिक्त आहेत. शिवाय शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची (वर्ग ३, श्रेणी ३) ९ पदे रिक्त आहेत.
मुख्याध्यापकाची २९८ पदे रिक्त
जळगावात ग्रेडेड मुख्याध्यापकाची ४९६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १९८ पदे कार्यरत आहेत. २९८ ग्रेडेड मुख्याध्यापक पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे तात्काळ पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर
जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी पद सुध्दा रिक्त आहे. या पदांचा प्रभारी अधिकाऱ्यांकडून पदभार सोपविण्यात आला आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सुध्दा अतिरिक्त कार्यभार आहे.
तक्रारी सोडवायच्या कुणी...
- शिक्षण विभागातील रिक्त पदांचा परिणाम कामकाजावर होत आहे. अनेक शिक्षक, पालकांच्या तक्रारींचा निपटाराही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
- रिक्त पदांमुळे एका अधिकाऱ्यावर दोन ते तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
- अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण वाढला आहे.
- तालुक्यावर अधिकारी नसल्यामुळे थेट तक्रारदारांना तक्रारीसाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गाठावा लागतो.
००००००००००००
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
जि. प. शिक्षण विभागात शिक्षणाधिकारीपासून ते शिक्षकापर्यंत सर्वच ठिकाणी अनेक पदे रिक्त असून सर्व पदभार हा प्रभारी यांच्याकडे असल्याने त्याचा निश्चितच परिणाम गुणवत्तेवर होतो. कारण प्रभारी यांना आपला नियमित कार्यभार सांभाळून प्रभारी पदभारही सांभाळावा लागतो. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढतो. पदोन्नती प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांना पत्र दिलेले आहे. तरी पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ राबवावी.
- सोमनाथ ब्रिजलाल पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती प्राथमिक, जळगाव
०००००००००००००
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा निश्चितपणे उद्दिष्टे साध्य करण्यावर परिणाम होत आहे. शिक्षक नसेल तर दोन वर्ग एकत्र केल्यामुळे वैयक्तिक लक्ष देऊन क्षमता विकसित करण्यात अडचणी येतातच. तेच मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याबाबत सांगता येईल. या जागा भरणे आवश्यक आणि उद्दिष्टे क्षमतेने साध्य होण्यासाठी गरजेचे आहे.
- रवींद्र सोनवणे,
अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ
---------
जिल्ह्यातील शाळा - ३३९९
शासकीय शाळा - ३१
अनुदानित शाळा - ९६२
विनाअनुदानित शाळा - १५६
०००००००००
रिक्त पदे
केंद्रप्रमुख
एकूण पदे - ४९
रिक्त पदे - २८
-----
विस्तार अधिकारी (वर्ग ३, श्रेणी २)
एकूण पदे - १३
रिक्त पदे - १०
-----
विस्तार अधिकारी (वर्ग ३, श्रेणी ३)
एकूण पदे - १३
रिक्त पदे - ९
-----
ग्रेडेड मुख्याध्यापक
एकूण पदे - ४९६
रिक्त पदे - २९८