Jalgaon Crime: जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करणअयात आल्याने खळबळ उडाली आहे. २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दीक्षित वाडी शेजारील महावितरण कार्यालयाजवळ निघृण हत्या करण्यात आली. वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी विशालवर वार करून त्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ६ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.
मयत विशालचा चुलत भाऊ आकाश जनार्दन मोची याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. फिर्यादीनुसार आकाश आणि विशाल दोघेही काशीबाई उखाजी शाळेजवळ वेल्डिंगच्या दुकानात काम करतात. रविवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आकाश, विशाल आणि त्यांचा मित्र रोहित भालेराव हे घरासमोर गप्पा होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने तिघेही मोटारसायकलने महावितरण कार्यालयाकडे तक्रार देण्यासाठी निघाले. दीक्षितवाडी येथील जिम समोरून जात असतानाच भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि त्यांचे इतर ३ ते ४ साथीदार वाढदिवस साजरा करत उभे होते. विशाल आणि त्याचे मित्र बाईकवरुन जाताना पाहताच या टोळक्याने त्यांचा पाठलाग केला.
६ ते ७ हल्लेखोरांनी तिघांनाही गाठलं आणि विशालवर हल्ला केला. त्यावेळी विशाल सोबत असलेले आकाश आणि रोहित घाबरून पळू गेले. हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले. त्यानंतर ते तिथून पळून गेले. त्यानंतर आकाशने तत्काळ त्याच्या घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर विशालचे वडील, भाऊ, आई आणि चुलते महावितरण कार्यालयाजवळ पोहोचले आणि त्यांनी विशालला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून विशालला मृत घोषित केले. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर दुपारी नातेवाईकांनी विशालचा मृतदेह ताब्यात घेतला आणि कारवाईची मागणी केली.
पाठलाग करत महावितरण कार्यालयाच्या गेटजवळ पोहोचताच भूषण अहिरे, पवन, आकाश उर्फ खंड्या ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांनी बाईकवर मागे बसलेल्या विशाल मोचीला खाली ओढले. त्यानंतक खंड्या, बद्या आणि भूषण यांनी चाकूने आणि इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी विशालला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोर 'आम्ही भूषण भाचाचे साथीदार आहोत. आमच्यावर एमपीडीए लावता का, मारूनच टाकतो' असे ओरडत होते. त्यांनी विशालच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर चाकूने गंभीर वार केले, ज्यामुळे तो जागीच कोसळला.
दरम्यान, आकाश मोचीच्या जबाबानुसार, आरोपी पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि भूषण मनोज अहिरे यांना तो ओळखतो. २०१२ मध्ये आकाश आणि त्याचा मित्र रोहित भालेराव यांच्यासोबत आरोपींचा वाद झाला होता. तसेच, विशाल आणि त्याचे मित्र संबंधित असल्याने, आरोपींचा त्यांच्यावर राग होता. याच जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ बंड्या सुखलाल ठाकूर याच्यासह ६ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.