२० वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत विष देऊन केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 04:36 PM2020-11-10T16:36:10+5:302020-11-10T19:07:08+5:30

तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय दलित तरुणीवर तिघांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे लैंगिक अत्याचार केला व यानंतर वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष देण्यात आले.

20-year-old girl tortured to death | २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत विष देऊन केली हत्या

२० वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत विष देऊन केली हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकासोदा येथील घटना तिघा तरुणांसह महिलेविरुद्ध गुन्हा

पारोळा :  तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय दलित तरुणीवर तिघांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे लैंगिक अत्याचार केला व यानंतर वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष देण्यात आले. तेथून तशाच अवस्थेत पारोळा येथे आणत मळ्यात फेकून  दिले. दुसऱ्या दिवशी ती बेशुद्धावस्थेत आढळली, मात्र उपचार घेत असताना तिचा १० रोजी पहाटे मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने पारोळा तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात खळबळ माजली आहे. याप्रकरणी टोळी गावातील २ संशयिताना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य एक तरुण व त्यांना सहकार्य करणारी महिला अशा दोघांच्या शोधात पोलीस आहेत.
    या निंदनीय पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, टोळी ता. पारोळा येथील २० वर्षीय तरुणी ही पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती. ती दिवाळीच्या सुटीत पारोळा येथे वास्तव्याला असलेले तिच्या मामांकडे ३ नोव्हेंबर पासून आली होती. ७ रोजी दुपारी अडीच वाजता मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली. पण बराच उशिरा पर्यन्त घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. तपास न लागल्याने तिच्या मामांनी पारोळा पोलिस ठाण्यात भाची हरविल्याची नोंद ८ रोजी सकाळी १०वाजता केली. यानंतर ८ रोजीच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ती जुलूमपुरा येथील लालबागच्या मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी या ठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना ही मुलगी दिसली. त्यांनी लगेच मोटारसायकलने तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार झालेत. तिने मृत्यूशी झुंज दिली पण १० रोजी पहाटे ४ वाजता तिची प्राणज्योत विझली.
        दरम्यान या तरुणीला ८ रोजी उपचारासाठी धुळे येथे नेत असतांना तिला फागणे गावाजवळ शुद्ध आली होती. काय प्रकार झाला, त्या विषयी विचारणा केली असता तिने  सांगितले की, ओळखीचा शिवनंदन पवार याने मला गुंगीचे औषध देऊन त्याच्या सोबत असलेले पप्पू अशोक पाटील , अशोक वालजी पाटील (सर्व, रा. टोळी )  या तिघांनी  पारोळा येथून बळजबरीने एका वाहनातून मला कासोदा येथे नेले व गुंगीचे औषध देऊन रात्रभर माझ्यावर आळीपाळीने  बलात्कार केला  तसेच वाच्यता होऊ नये म्हणून मला बळजबरी विष पाजले. ही घटना पिडीतेने आई व मामा व बहीण  यांच्याजवळ कथन केली. दरम्यान धुळे येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर  १० रोजी पहाटे ४ वाजता तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
यावेळी मयत पिडीतेच्या मामाने भाचीने मृत्यूपूर्वी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघे तरुण व अन्य साथ देणारी एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीतीने एका आरोपीने घेतले वीष
या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात असलेला शिवनंदन शालीक पवार या  आरोपीने अटक होण्याच्या भीतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ उपचार झाल्याने तो वाचला आहे. त्याच्यावर धुळे येथे एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा पहारा दवाखान्यात लावण्यात आला आहे. दवाखान्यातून सुटी मिळाल्यावर त्यास ताब्यात घेण्यात येणार आहे.दरम्यान अन्य एकास  आधीच ताब्यात घेतले  असून त्याची विचारपूस सुरू आहे.


तिसऱ्या आरोपीच्या शोधत पथक रवाना
या घेतनेतील शिवनंदन व अशोक वालजी पाटल हे दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर तीसरा तरुण पप्पू व  साथ देणारी महिला यांच्या   शोधार्थ पोलिसांचे एक पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली.


बहिणीने फोडला टाहो
कायगुन्हा होता माझ्या बहिणीच्या, तीन नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे ठार मारले. माझ्या बहिनीचा नाहक बळी घेणाऱ्या नराधमांना अटक करावी. अटक झाल्यावरच आम्ही बहिणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून असा आक्रोश करीत मन हेलावून टाकणारा टाहो अत्याचार झालेल्या तरुणीच्या बहिणीने पोलिस प्रशासनासमोर फोडला.

 

Web Title: 20-year-old girl tortured to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.