गृहउद्योगाच्या नावाने १२ लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:19 IST2020-02-20T12:18:48+5:302020-02-20T12:19:22+5:30
फससणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता

गृहउद्योगाच्या नावाने १२ लाखात फसवणूक
जळगाव : महिला गृह उद्योगाच्या नावाने १४ महिलांची ११ लाख २० हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून प्रज्ञा संजीवन फाउंडेशन महिला उद्योगाच्या पदाधिकारी वैशाली श्यामकुमार सोलंकी (रा.दत्त कॉलनी, शाहू नगर, जळगाव) व भानुदास शिवाजी पवार (रा.जिल्हा पेठ, जळगाव) यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात मंगळवारी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नीता संजय बारी (३८, रा.कुºहे पानाचे, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रज्ञा संजीवन फाउंडेशन महिला उद्योगाच्या नावाने महिलांना रोजगार व उद्योग मिळवून देण्यासाठी वैशाली सोलंकी व भानुदास पवार यांनी नीता बारी यांच्यासह चित्रा सूरज पाटील, आयशा शेख इसाक, वंदना भरत जाधव, सविता किशोर बारी, सविता कमलाकर बारी, कविता प्रदीप बारी, सुनीता नीलेश मेश्रामकर, ज्योत्स्ना किरण पाटील, समरीन शेख शाहरुख, विद्या उत्तम तायडे, सुजाता महेंद्र गाडे, सुनीता पाटील व हेमलता इंगळे या १४ महिलांना संस्थेचे सभासद केले. १ सप्टेबर २०१९ पासून या महिला संस्थेच्या सभासद झाल्या.
प्रत्येकी ४०० रुपये आकारले
सभासद करताना १०० रुपये सभासद शुल्क व ३०० रुपये अनामत असे एका महिलेकडून ४०० रुपये घेण्यात आले. या महिलांच्याव्यतिरिक्त इतर महिलांनीही शुल्क भरले. सर्व महिला वैशाली व भानुदास यांच्याकडे चार महिन्यापासून काम सुरु करण्याबाबत तगादा लावत आहेत, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.सर्व कागदपत्रे व पैसे वैशाली हिने स्वत:कडे ठेवून घेत या महिलांना रोजगारासाठी टोलवाटोलवी करु लागली. रोजगाराचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर नीता बारी यांनी मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणूक झालेल्या महिलांची संख्या मोठी
सोलंकी व पवार यांनी रोजगाराचे आमिष दाखवून शेकडो महिलांकडून पैसे उकळले असून प्राथमिक स्तरावर १४ महिलांची नावे पुढे आलेली आहेत. हा आकडा खूप मोठा असल्याचे नीता बारी यांनी म्हटले आहे. पैसे घेऊन आजपर्यंत या दोघांनी कोणालाही काम दिलेले नाही.