‘अंतर्नाद’च्या शाडूची गणेश मूर्ती बनवा कार्यशाळेत १४०० गणेशप्रेमींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:32 IST2020-08-19T22:31:32+5:302020-08-19T22:32:52+5:30
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे झूम अॅपच्या माध्यमातून शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली.

‘अंतर्नाद’च्या शाडूची गणेश मूर्ती बनवा कार्यशाळेत १४०० गणेशप्रेमींचा सहभाग
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे झूम अॅपच्या माध्यमातून शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली. त्यात विविध प्रकारची सोशल माध्यमे वापरून १४०० पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांनी सहभाग घेतला. मूर्तिकार रमाकांत भालेराव यांनी तंत्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर घुले यांनी, तर सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. तांत्रिक बाजू योगेश इंगळे, अमित चौधरी यांनी सांभाळली. १० वर्षे ते ७० वर्षे वयोगट सहभागी झाला. रमाकांत भालेराव यांनी शाडूमातीच्या गणरायाची मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक आॅनलाइन सादर करून संवादही साधला. अनेकांनी या कार्यशाळेचा लाभ घेत असतानाच आकर्षक गणरायाच्या मूर्ती साकारल्या. जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. ज्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला त्यांनी येत्या २१ आॅगस्टपर्यंत मूर्ती बनवतानाचा व रंगकाम झाल्यानंतरच्या मूर्तीचा एक असे दोन फोटो प्रतिष्ठानच्या समन्वय समितीकडे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्वर घुले, प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, सहसमन्वयक सचिन पाटील यांनी आयोजन, नियोजनाची जबाबदारी पार पाडली. उपक्रम समिती सदस्य योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, देव सरकटे, जीवन सपकाळे, विक्रांत चौधरी, हरीश कोल्हे, मिलिंद कोल्हे, अमित चौधरी, समाधान जाधव, संदीप सपकाळे, राजू वारके, भूषण झोपे, प्रा. श्याम दुसाने यांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाचे नवे व्यासपीठ
शाडूच्या मातीपासून आकर्षक मूर्ती साकारणाºया पाच स्पर्धकांना पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची चळवळ या माध्यमातून उभी राहील. आॅनलाइन कार्यशाळेला जो प्रतिसाद मिळाला तो उत्साह वाढवणारा आहे, असे अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले.
मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार
शाडूमातीची मूर्ती बनविण्याचा आनंद शब्दातीत असतो. या मूर्तीचे विसर्जन पाण्यात लवकर होते. अर्थात, उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहते. मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आॅनलाइन कार्यशाळा उपक्रम पथदर्शी ठरेल, असे गौरवोद्गार प्रशिक्षक रमाकांत भालेराव यांनी काढले.