१२ शेतकऱ्यांनी रक्ताने स्वाक्षऱ्या करून दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:30+5:302021-08-18T04:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, ...

१२ शेतकऱ्यांनी रक्ताने स्वाक्षऱ्या करून दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या केलेले निवेदन तहसीलदारांना दिले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हे शेतकरी जळालेली पिके घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले होते.
जळगाव तालुक्यातील सुजदे, भोलाणे या भागातील शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी एका छोट्या बाटलीत इंजेक्शनद्वारे रक्त काढून घेतले होते. १२ शेतकऱ्यांनी काढलेले या रक्ताने निवेदानावर नावापुढे माचिसच्या काडीने एक एक करून स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर हे निवेदन व पाऊसपाण्याअभावी जळालेली पिके घेऊन त्यांनी तहसीलदारांना दिले.
शासनाला जागे करण्यासाठी रक्ताचा वापर
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कधी अवकाळी पावसाने तर कधी पावसाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीकविम्याची रक्कम मिळतच नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. अखेर शासनाला जाग येण्यासाठी त्यांना व्यथा कळण्यासाठी आम्ही आता रक्तानेच सह्या करून निवेदन देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
यांनी केल्या स्वाक्षऱ्या
संभाजी सोनवणे, दिनेश सोनवणे, मोहन सोनवणे, जगदीश सोनवणे, महारू सोनवणे, जनार्दन सोनवणे, अर्जुन सोनवणे, डिगंबर सोनवणे, सुक्राम सोनवणे, गोकुळ सोनवणे, जितेंद्र सोनवणे, गणेश सोनवणे या शेतकऱ्यांनी नावे लिहून रक्ताने स्वाक्षऱ्या केल्या.