आव्हाण्यात एकाच रात्री १२ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:30+5:302021-07-03T04:11:30+5:30
जळगाव : आव्हाणे येथे गुरुवारी एकाच रात्री तब्बल १२ घरफोड्या झाल्या असून, या घरफोड्यांमधून लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. ...

आव्हाण्यात एकाच रात्री १२ घरफोड्या
जळगाव : आव्हाणे येथे गुरुवारी एकाच रात्री तब्बल १२ घरफोड्या झाल्या असून, या घरफोड्यांमधून लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. विशेष म्हणजे रहदारीचा भाग सोडून नवीन प्लॉट एरियांमध्येच या चोऱ्या झाल्या आहेत. चोरट्यांनी रेकी करीत बंद असलेले घरे टार्गेट केली आहे.
आव्हाणे येथे एकाच रात्री १२ घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. आव्हाणे गावात आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व घरांमध्ये जाऊन तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने जाऊन पंचनामे केले आहेत.
रेकी करूनच केली घरफोडी
या चोरीमध्ये गावातील नवीन प्लॉट एरियामधीलच घरे टार्गेट करण्यात आली आहेत. त्यात ही सर्व १२ घरे ही काही दिवसांपासून बंद होती. या घरांमधील सदस्य वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेरगावाला गेलेले होते. त्यामुळे प्राथमिक तपासात चोरट्यांनी अनेक दिवसांपासून आव्हाणे गावात रेकी करून, आपले टार्गेट निवडल्याचे स्पष्ट होत आहेत. तसेच नवीन एरियातील कॉर्नरच्याच घरांमध्ये चोरी झाली असल्याचेही दिसून येत आहे.
सकाळी लक्षात आला प्रकार
चोरट्यांनी १२ घरांसह इतर घरांमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरात रहिवासी असल्याने त्या घरांमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. काही घरांच्या दरवाज्याचा कड्यादेखील चोरट्यांनी तोडल्या. कड्या तुटलेल्या घरांच्या सदस्यांना सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर नवीन प्लॉट एरियात एकच खळबळ उडाली. गुरुवारी रात्री गावात झालेल्या घरफोड्या या रात्री १ ते पहाटे ३ वाजेदरम्यानच झाल्याचा संशय आहे. नागरिकांनी इतर घरांमधील परिस्थिती पाहिल्यानंतर अनेक घरांचे दरवाज्यांचे कुलूप तुटल्याचे आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार सकाळी ७ वाजेदरम्यान उघडकीस आला.
या भागात झाल्या घरफोड्या पंढरीतात्या नगर, प्रताप जिभाऊ नगर, सरुआई नगर, खुबचंद साहित्या नगर व श्रीधर नगर या भागात या घरफोड्या झाल्या आहेत.
यांच्या घरात झाली चोरी
रमेश पाटील यांच्या घरातून ६० भार चांदीचे व २२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
निंबदास पाटील यांच्या घरातून २३ हजार रुपयांची रोकड
दिलीप रामचंद्र चौधरी यांच्या घरातून २ हजारांची रोकड रक्कम
राहुल चौधरी यांच्या घरातून ३ हजार रोकड रक्कम
इंद्रकुमार बिहारी यांच्या घरातून ३ हजार रुपयांची रोक रकमेसह ९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
भावलाल सपकाळे यांच्या घरातून २ हजारांची रोकड रक्कम चोरीला गेली आहे.
यांच्या व्यतिरिक्त इतर घरांमधून चोरट्यांना काहीही आढळून आले नसल्याने सामान अस्ताव्यस्त फेकून देत पसार झाले.
भंगार विक्रेत्यांवर संशय
गेल्या आठ दिवसांपासून गावात काही भंगार विक्रेते दाखल झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून हे विक्रेते गायब झाले. या विक्रेत्यांनी केवळ नवीन प्लॉट एरियामध्ये फेरफटका मारल्याचा माहिती आव्हाणे येथील ग्रामस्थांनी दिली. याच भंगार विक्रेत्यांनीच रेकी करून, चोरी केल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
सरुआई नगरातील सर्व घरांच्या बाहेरून लावून घेतल्या कड्या
चोरट्यांनी सरुआई नगरातील एक घर फोडले, हे घर फोडण्याआधी चोरट्यांनी या गल्लीमधील इतर घरांच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. जेणेकरून कोणाला जाग आली तरी बाहेर येता येणार नाही म्हणून चोरट्यांनी दक्षता घेतल्याचे आढळून आले.
शेतात पाणी भरणारे असतील म्हणून केले दुर्लक्ष
रात्री २ वाजेच्या सुमारास खेडी रस्त्यालगत असलेल्या एका रहिवाश्याला काही जण दिसून आले. मात्र, शेतात पाणी भरायला जात असलेले कामगार किंवा वाळू उपसा करणारे कामगार असतील अशा शक्यतेने या चोरट्यांकडे दुर्लक्ष केले.
- रात्री १ ते ३ वाजेदरम्यान झाल्या घरफोड्या
- अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घरांना केले टार्गेट
- रेकीनंतरच चोरी झाल्याचा पोलिसांचा अंदाज
- जुन्या गावाकडे दुर्लक्ष करून, नवीन प्लॉट एरियातच झाल्या घरफोड्या
- ५ ठिकाणी घरफोड्या झाल्या अयशस्वी
- पोलिसांनी केला पंचनामा, गावाबाहेरचीच टोळी असल्याचा संशय