बोरगावात कापसाच्या ट्रकखाली सापडून तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:03 IST2018-01-05T01:03:14+5:302018-01-05T01:03:49+5:30
कापसाने भरलेल्या ट्रकने चिरडल्यामुळे तरुण जागीच ठार झाला.

बोरगावात कापसाच्या ट्रकखाली सापडून तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / सिपोराबाजार : कापसाने भरलेल्या ट्रकने चिरडल्यामुळे तरुण जागीच ठार झाला. भोकरदन जाफराबाद रस्त्यावरील बोरगाव जहाँगीर येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव भागवत साहेबराव अवकाळे (२३, रा. चापनेर, ता. जाफराबाद) असे आहे. विवाहासाठी मुलगी बघून घरी जात असतानाच हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
विवाहाचे स्वप्न अधुरेच
चापनेर येथील साहेबराव अवकाळे यांना दोन मुली व भागवत हा एक मुलगा होता. भागवतसाठी तालुक्यातील हसनाबाद येथील स्थळ आल्यामुळे त्यांनी जावई व मुलास मुलगी बघण्यास पाठविले. मात्र, या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रात्री भागवतवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात चूलही पेटली नाही.