शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:42+5:302021-01-08T05:41:42+5:30

इब्राईमपूर येथील घटना भोकरदन : शेततळ्याच्या भिंतीवरून चालत असताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ...

The young woman died after falling in the field | शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

इब्राईमपूर येथील घटना

भोकरदन : शेततळ्याच्या भिंतीवरून चालत असताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील इब्राईमपूर येथे सोमवारी दुपारी घडली. पूजा सिधूसिंग डोभाळ (२०), असे मयत तरुणीचे नाव आहे.

भोकरदन शहरापासून चार किलोमीटर अंतर असलेल्या इब्राईमपूर येथील शेतात सिधूसिंग डोभाळ यांचे कुटुंब राहते. पूजा ही औरंगाबाद येथील बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे पूजा मागील नऊ ते दहा महिन्यांपासून घरीच होती. सोमवारी दुपारी ती, तिच्या वहिनीसोबत शेततळ्यावर गेली होती. शेततळ्याच्या भिंतीवर चालत असताना पाय घसरून ती शेततळ्यात पडली. सोबतच्या महिलेने आरडाओरड केली; परंतु तेथे कोणीही नव्हते. पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला पाण्यातून बाहेर काढले. तिला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉ. दीपक सोनुने यांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळाचा पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले

पूजा ही औरंगाबाद येथे बीडीएसचे शिक्षण घेत होती. तिला डॉक्टर बनायचे होते. त्यामुळे ती सतत अभ्यास करीत होती; परंतु सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. तिच्या पार्थिवावर इब्राईमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, बहीण, दोन काका असा परिवार आहे.

दवाखान्यात पाय ठेवताच वडिलांना कळली घटना

पूजाचे वडील हे नेहमीच आजारी असतात. ते सोमवारी तपासणीसाठी औरंगाबाद येथे गेले होते. दवाखान्यात पाय ठेवताच सिधूसिंग डोभाळ यांना मुलगी शेततळ्यात पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी दवाखाना न करताच इब्राईमपूरकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळले. पूजाचे एक काका रविवारीच पुण्याला गेले होते. दुसरे जिनिंगवर गेले होते.

Web Title: The young woman died after falling in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.