महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:02+5:302021-01-13T05:21:02+5:30
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो भोकरदन : अचानक समोर आलेल्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचालक कंटेनरखाली चिरडला गेल्याची घटना ...

महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो
भोकरदन : अचानक समोर आलेल्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचालक कंटेनरखाली चिरडला गेल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भोकरदन-जालना रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटलसमोर घडली. शेख कलीम शेख रईस (१८, पानगल्ली, उस्मानपेठ, भोकरदन ) असे मयत तरुणाचे नाव आहे. यावेळी तरुणाने प्राण वाचविलेली महिला किरकोळ जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानपेठ भागातील रहिवासी शेख कलीम हा तरुण गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करतो. मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त तो जालना रोडवरील गिरणारे हॉस्पिटल परिसरात आला होता. येथील काम आटोपून तो दुचाकीने परत निघाला. रस्त्यात अचानक त्याच्यासमोर एक महिला आल्याने तिला वाचविण्यासाठी कलीमने गाडी थोडी बाजूला घेतली. याच दरम्यान, भोकरदनहून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरला (जीजे.२६.टी.५९६१) त्याची धडक बसली. धडकेनंतर कलीम हा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जवळपास अर्धा तास मृतदेह जागेवर पडून होता. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघाताचा पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. कलीमच्या मृत्यूच्या बातमीनंतर रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
एकुलता एक मुलगा होता
अपघातात ठार झालेला कलीम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो एका गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करीत होता, तर वडील दुसऱ्याच्या दुकानात केळी व पान विक्री करतात. शेख रईस यांना विवाहनंतर नऊ वर्षांनी मुलगा झाला होता. या पती-पत्नीने कलीमला मोलमजुरी करून दहावीपर्यंत शिकवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने शिक्षण सोडून एका गॅरेजवर मेकॅनिकचे काम सुरू केले. परंतु, मंगळवारी काळाने घाला घातल्याने त्याचा मृत्यू झाला.
आधार गेला आम्ही कशासाठी जगावं....
आम्हाला एकुुलता एक मुलगा होता. आमच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करीत होता. त्यातून आमचा उदरनिर्वाह चालायचा. मुलगाच आमचा आधार होता. आता तोही गेला आम्ही कशासाठी जगायचे, असा प्रश्न कलीमचे वडील शेख रईस यांनी उपस्थित केला.