संजय मांडवे
रांजणी : मुलींना मोफत शिक्षण आणि चांगल्या सुविधा दिल्याचा दावा शासन, प्रशासनाकडून वेळोवेळी केला जातो. परंतु, चित्रवडगाव, ढोबळेवाडी येथील सावित्रीच्या लेकींना शिक्षणासाठी चक्क चिखलातून रस्ता शोधावा लागत आहे. बससेवा नसल्याने अनेक मुलींना शिक्षणही अर्धवट सोडावे लागत आहे.
रांजणी येथील स. भु. विद्यालयात परिसरातील अनेक गावचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. येथून जवळच असलेल्या चित्रवडगाव व ढोबळेवाडी येथील विद्यार्थ्यांना मात्र बससेवा मिळत नसल्याने चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. दोन्ही गावातील ५० ते ६० विद्यार्थ्यांसह मुलींना शाळेत येताना गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे शिक्षणासाठी मुलींना मोफत बस प्रवास पास दिला जातो. परंतु, गावात बस येत नसल्याने येथील मुला-मुलींना चिखलातूनच वाट शोधत शाळा गाठावी लागत आहे. गावातील माधुरी विष्णू यादव (९ वी), गायत्री भारत ढोबळे (८ वी), रूपाली मारोती भोसले (९ वी), पल्लवी गोपाळ मातने (१० वी) या मुलींनी शिक्षणासाठी होणारी कसरत व्यक्त केली. मुलींची ही कसरत दूर करण्यासाठी आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखरूप होण्यासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे.
कोट
मी ढोबळेवाडी येथून शिक्षण घेण्यासाठी रांजणीत जाते. परंतु, पाऊस पडल्यानंतर आम्हा मुला-मुलींना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. अनेकवेळा रस्त्यावर गुडघाभर चिखल होतो. याचाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चित्रवडगाव, ढोबळेवाडी गावांना मानव विकासअंतर्गत बससेवा सुरू करावी.
वैष्णवी भोसले, ढोबळेवाडी
चौकट
मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना साकडे
चित्रवडगाव, ढोबळे वाडी येथील मुला-मुलींची बसअभावी मोठी गैरसोय होत आहे. कोरोनामुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यात आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळा गाठण्यासाठी चिखलातून रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करून मुला- मुलींसाठी मानव विकासअंतर्गत बस बससेवा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उध्दव यादव यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.