आधार, मोबाईल सिडिंगसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST2021-01-09T04:26:07+5:302021-01-09T04:26:07+5:30

जालना : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक ...

Workshop for Aadhaar, Mobile Seeding | आधार, मोबाईल सिडिंगसाठी कार्यशाळा

आधार, मोबाईल सिडिंगसाठी कार्यशाळा

जालना : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडिंग शंभर टक्के पूर्ण करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात शुक्रवारी स्वस्त धान्य दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्ये यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेच्या सुमारे १६.९३ लक्ष लाभार्थ्यांपैकी ८९ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, आधार सिडींगची प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांनी निर्धारित वेळेत स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनमधील ई- केवायसीद्वारे आधार सिडींग व मोबाईल सिडींग करून घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी रिना बसय्ये यांनी सांगितले.

यावेळी प्रशिक्षक रवी मिसाळ, शुभम नारळे यांनी तांत्रिक माहिती देऊन पॉस मशीन बाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले. कार्यक्रमास सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही. व्ही. महिंद्रकर, जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी पी.सी. उघडे, नायब तहसीलदार एन. वाय. दांडगे, अव्वल कारकून जे.डी. कावळे, एन. व्ही. क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष मनित कक्कड, ग्रामीणचे अध्यक्ष विश्वनाथ ढवळे यांची उपस्थिती होती. कोरोनात उत्कृष्टरित्या धान्य वाटप केल्याबद्दल स्वस्त धान्य दुकानदारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Workshop for Aadhaar, Mobile Seeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.