भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याचे काम तरुणांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:24+5:302021-01-03T04:31:24+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. यात खडीकरण व मजबुतीकरणाचे ...

भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याचे काम तरुणांनी पाडले बंद
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. यात खडीकरण व मजबुतीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या तरुणांनी सुरू असलेले काम शनिवारी दुपारी बंद पाडले.
भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याचे दीड किलोमीटर अंतरावरील खडीकरण व मजबुतीकरण करण्यात येत आहे. या कामादरम्यान एक नळकांडी पूल आहे. या रस्त्याच्या कामासाठी जवळपास १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या अंदाजपत्रकानुसार या रस्त्याचे व पुलाचे काम होणे गरजेचे आहे; परंतु गुत्तेदार व अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर फक्त १ ते २ इंच खडी व १ इंच मुरूम अंथरण्यात आला आहे. हे काम चांगल्या दर्जाचे करण्यासाठी वेळोवेळी बजावले होते; परंतु ठेकेदाराचे दुर्लक्ष होत होते, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारीही मूग गिळून गप्प बसले होते. ठेकेदाराकडून डस्ट वापरली जात असून, पुलाच्या कामामध्ये निकृष्ट दर्जा दिसून येत असल्याने शनिवारी युवकांनी हे काम बंद पाडले. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
काेट
भांबेरी ते हिरडपुरी या दीड किलोमीटर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होत नसल्याने हा रस्ता पुढे किती दिवस तग धरणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. रस्त्याचे काम योग्य पद्धतीने न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- तुळशीराम केजभट,
ग्रामस्थ, भांबेरी
माहिती फलक लावावा
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी हा ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाया जात असून, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, रस्ता कामाची माहिती देणारा फलक लावावा.
- रजनीश कणके ग्रामस्थ, भांबेरी