महिला रुग्णालय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST2021-01-15T04:26:11+5:302021-01-15T04:26:11+5:30
जालना : शहरातील गांधीचमण परिसरातील महिला रुग्णालयाच्या इमारतीत महिला रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभागाचे काम सुरू आहे; ...

महिला रुग्णालय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात
जालना : शहरातील गांधीचमण परिसरातील महिला रुग्णालयाच्या इमारतीत महिला रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभागाचे काम सुरू आहे; परंतु या इमारतीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. परिणामी, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून रुग्णवाहिका रुग्णालयात नेताना चालकांना कसरत करावी लागते. याचा नाहक त्रास रुग्णांसह नातेवाईक, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
कोराेनाचा प्रादुर्भाव झाला आणि जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग गांधीचमण परिसरात असलेल्या महिला रुग्णालयाच्या इमारतीत नेण्यात आला. एकाच इमारतीत दोन्ही रुग्णालये सुरू असून, येथे येणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांचीच संख्या दैनंदिन एक हजारावर आहे; परंतु या इमारतीच्या प्रवेशद्वारावर, बाह्यद्वारावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अनेक वाहने खासगी प्रवेशद्वारावरच उभी असतात. त्यामुळे रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला हे वाहन वाटेतून निघेपर्यंत थांबावे लागते. अनेक वेळा चालक वाहन सोडून बाहेर गेला असेल, तर आऊट गेटमधून रुग्णवाहिका आतमध्ये न्यावी लागत आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहनेही रुग्णालयात नेताना कसरत करावी लागत आहे. या इमारतीत टवाळखोरांसह तळीरामांचा वावरही वाढला असून, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाइकांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महिला रुग्णालय इमारतीला पडलेला अतिक्रमणांचा विळखा काढण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे. दरम्यान, महिला रुग्णालय इमारतीत कायम पोलीस चौकी द्यावी, ही मागणी आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आपत्कालीन मार्ग बंद
महिला रुग्णालयात चार आपत्कालीन रुग्णमार्ग तयार करण्यात आले आहेत. कोणतीही घटना घडली तर येथून बाहेर निघणे शक्य होणार आहे.
सध्या जिल्हा रुग्णालयाची ओपीडी याच रुग्णालयात सुरू आहे. त्यामुळे दोन आपत्कालीन मार्ग उपद्रवी युवक व तळीरामांच्या त्रासामुळे बंद ठेवले आहेत.
जिल्हा रुग्णालयात आजवर
एक वेळेसच झाले मॉकड्रिल
महिला रुग्णालयाची इमारत नवीन आहे. येथील अग्निशमन स्प्रिंकलर पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे, तर जिल्हा रुग्णालयात दीड- दोन वर्षांपूर्वी केवळ एक वेळेसच मॉकड्रिल झाले असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जालना शहरातील महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच अशी दुकाने थाटली जात आहेत. (छायाचित्र : किरण खानापुरे)