महिलांनी इतिहास निर्माण करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:01+5:302021-01-04T04:26:01+5:30
वैशाली वाघ : टेंभुर्णीत पुरस्कारांचे वितरण टेंभुर्णी : सावित्रीबाई यांच्या अथक कष्टातून महिलांसाठी सोनेरी पहाट उगवली. त्यांंच्या कार्याचा केवळ ...

महिलांनी इतिहास निर्माण करावा
वैशाली वाघ : टेंभुर्णीत पुरस्कारांचे वितरण
टेंभुर्णी : सावित्रीबाई यांच्या अथक कष्टातून महिलांसाठी सोनेरी पहाट उगवली. त्यांंच्या कार्याचा केवळ गौरव करून चालणार नाही, तर आजच्या महिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन स्वत:चा स्वतंत्र इतिहास निर्माण करावा, असे मत टेंभुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली वाघ यांनी व्यक्त केले.
महिला शिक्षणदिनी टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सावित्री ज्योती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या रविवारी बोलत होत्या. येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वाचनालयाच्या संस्थापक सुनीता अंभोरे, डॉ. वैशाली वाघ, पोलीस कर्मचारी छाया जमधडे, आशा गट प्रवर्तक रेखा धनवई, अंगणवाडी सेविका विद्या गायमुखे, परिचारिका पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. आज ११ जणींचा इथे होत असलेला सत्कार हा त्यांंच्या समर्पित सेवेचा सन्मान आहे. पुढच्या वर्षी २२ महिला या पुरस्कारासाठी पात्र ठराव्यात, असा आशावादही डॉ. वाघ यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षिका सुखदा पाटील, सुनीता खलसे, पी. जी. तांबेकर, सावता तिडके, रामधन कळंबे, रेखा धनवई आदींची उपस्थिती होती. रावसाहेब अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. दिनकर ससाणे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. अरुण आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रावसाहेब अंभोरे, धोंडीराम कौटकर, फकरू कुरेशी, शेख साबेर, प्रा. सैलीप्रकाश वाघमारे, दीपक जाधव आदींनी पुढाकार घेतला होता.
टेंभुर्णीसह परिसरात कर्तव्य बजाविणाऱ्या ११ शिक्षिकांचा मानपत्र देऊन सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये सविता बंडरवाल (जि. प. शाळा जानेफळ), मीना जामदार (जि. प. शाळा, दत्तनगर), सुखदा पाटील (जि. प. प्रशाला, जाफराबाद), सुनीता खलसे (जि.प. शाळा, नळविहिरा), मंगला साने (जि. प. शाळा, टेंभुर्णी), रत्ना देशमुख (जि. प. शाळा, डावरगावदेवी), ज्योती जाधव (जेबीके विद्यालय, टेंभुर्णी), शेख सुमय्या रोशन (ईबीके उर्दू विद्यालय, टेंभुर्णी), वंदना ढेंगळे, (टेंभुर्णी), संगीता विधाते (मारोतराव पाटील विद्यालय, टेंभुर्णी), रोहिणी सोळंके (जिजाऊ इंग्लिश शाळा, टेंभुर्णी) यांचा समावेश आहे.
फोटो ओळ : टेंभुर्णी येथे महिला शिक्षणदिनी महात्मा फुले वाचनालयाच्या वतीने ११ शिक्षिकांना सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.