जिल्ह्यातील त्या २० ग्रामपंचायती पुन्हा बिनविरोध की रंगणार राजकारणाचा फड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:54+5:302020-12-23T04:26:54+5:30
मार्चपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच राज्यातील ...

जिल्ह्यातील त्या २० ग्रामपंचायती पुन्हा बिनविरोध की रंगणार राजकारणाचा फड?
मार्चपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला.
त्यातच शासकीय सेवा बजावलेल्या व्यक्तीला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश शासनाने दिल्याने अनेकजण हैराण झाले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केले असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणूक आयोगाने देखील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.
जालना जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या गतपंचवार्षिकला बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. यंदा मात्र, महाविकास आघाडीमुळे या निवडणुका बिनविरोध होण्याचे चित्र दिसून येत नाही. कारण भाजप स्वबळावर ग्रामपंचायत निवडणुका लढणार आहे. त्यामुळे या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होत्या की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . गतपंचवार्षिकला मंठा ५ तर भोकरदन तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती.
बिनविरोधची परंपरा असलेले जवखेडा खुर्द, मनापूर गाव
भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द, मनापूर येथे मागील ३० वर्षांपासून बिनविरोध निवडणूक होत आहे. जवखेडा खुर्द हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे गाव आहे. तर मनापूर हे पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण दळवी यांचे गाव आहे. या दोघांनीही गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली आहे.