बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का ; मुले म्हणतात नको रे बाबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:53+5:302021-05-17T04:28:53+5:30
कोरोनाच्या काळात पोलीस व डॉक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. या काळात त्यांच्या कामाचे तासदेखील वाढविण्यात आले आहे. सतत ...

बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का ; मुले म्हणतात नको रे बाबा !
कोरोनाच्या काळात पोलीस व डॉक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. या काळात त्यांच्या कामाचे तासदेखील वाढविण्यात आले आहे. सतत कामात असल्याने कुटुंबाला वेळ देता येत नाही. काही वेळा तर त्यांना जेवण्याच्या ताटावरून उठून जावे लागते. याचा परिणाम, त्यांच्या मुलाबाळांवर होत आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला तर भविष्यात काहींच्या मुलांनी डॉक्टर व पोलीस होण्यास नकार दिला आहे. तर काहींनी आपले वडील लोकांसाठी रात्रंदिवस काम करत असल्याने डॉक्टर व पोलीस होऊन लोकांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
१
माझे वडील नेहमीच कामात व्यस्त असतात. ते लोकांची सेवा करतात. ते घरी वेळ देत नसले तरी लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. मलाही त्यांच्याप्रमाणेच पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
उदय विनायक देशमुख,
माझे वडील पोलीस असल्याने नेहमीच घराबाहेर असतात. कधी-कधी तर त्यांना जेवण्याच्या ताटावरून उठावे लागते. कामामुळे आम्हाला वेळ देता येत नाही. त्यामुळे मला भविष्यात वैज्ञानिक व्हायचे आहे.
देवेन राजेंद्र वाघ,
माझे वडील पोलीस असल्याने नेहमीच घाईगरबडीत असतात. फोन आला की, ड्यूटीवर हजर राहावे लागते. सणाच्या दिवशीही ते ड्यूटीवर असतात. त्यामुळे भविष्यात मी पायलट होणार आहे.
राघव कृष्णा तंगे, जालना
माझे वडील अतिरिक्त आरोग्य अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरापासून ते रुग्णांची सेवा करीत आहे. ते करत असलेल्या कार्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो. मीही त्यांच्याप्रमाणेच डॉक्टर होणार आहे.
ऐश्वर्या संतोष कडले, जालना
घरी आल्यावर वडिलांचा फोन सतत चालू असतो. ते कोरोनामुळे आम्हाला वेळ तर सोडाच, पण साध्या गपासुध्दा मारू शकत नाही. त्यामुळे मला भविष्यात डॉक्टर व्हायचे नाही. इतर दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात करिअर करेल.
आस्था आदीनाथ पाटील, जालना
मी माझ्या वडिलांचे नाव प्रीकॉशन मॅन असे ठेवले आहे. कारण ते दिवसातून सात ते आठ वेळा अंघोळ करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आम्हाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात मला इतर क्षेत्रात करिअर करायचे आहे.
भार्गवी क्रांतिसिंह लाखेपाटील, जालना