टेंभुर्णीचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान पेलवणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:18+5:302021-02-19T04:20:18+5:30
नाल्यांच्या साफसफाईसह अनेक समस्यांंचा करावा लागणार सामना टेंभुर्णी : टेंभुर्णीच्या इतिहासात प्रथमत: सरपंच व उपसरपंच पदावर महिला सदस्यांची निवड ...

टेंभुर्णीचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान पेलवणार काय?
नाल्यांच्या साफसफाईसह अनेक समस्यांंचा करावा लागणार सामना
टेंभुर्णी : टेंभुर्णीच्या इतिहासात प्रथमत: सरपंच व उपसरपंच पदावर महिला सदस्यांची निवड झाली आहे. दरम्यान, या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी अद्याप आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा गावचा पाणीप्रश्न तसेच गावांतर्गत अनेक समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांसमोर असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
टेंभुर्णीकरांना बाराही महिने नळाच्या पाण्यासाठी १५ ते २० दिवसांपर्यंत वाट पाहावी लागते. आज २१ दिवस उलटून गेले तरी गावातील अनेक झोनला अद्यापही नळाचे पाणी आलेले नाही. अनेक सरपंच आले आणि गेले. मात्र, टेंभुर्णीकरांचा पाणीप्रश्न होता तसाच आहे. गावच्या अगदी जवळ अकोलादेव येथे तालुक्यातील सर्वात मोठे जीवरेखा धरण असतानाही टेंभुर्णीकर नेहमी तहानलेलेच राहिलेले आहेत.
आज गावात पाणी साठविण्यासाठी असलेले तीन जलकुंभ गावच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पर्याप्त नाहीत. त्यातच गावांतर्गत जलवाहिनीला सगळीकडे गळती लागल्याने नळाला पाणी आल्यावर नळातून कमी पण रस्त्यावरच जास्त पाणी दिसते. त्यातच लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठ्यासाठी पूर्णवेळ वीज मिळत नसल्याने त्याठिकाणी स्वतंत्र फीडरची आवश्यकता आहे.
याशिवाय गावातील नाल्यातही घाण साचल्याने अनेक भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते, तर गावातील बसस्थानकासह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने माणसांना लघुशंकेसाठी अडोसा शोधावा लागतो. यात महिला वर्गासाठीही कुठेही स्वच्छतागृह नसल्याने वर्षानुवर्षांपासून त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. आता गावच्या महत्त्वाच्या दोन्ही पदांवर महिला पदाधिकारी असल्याने महिलांचे प्रश्न तरी प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी त्या पुढाकार घेणार काय, असा प्रश्नही जनता विचारीत आहे.
एकंदर सरपंच- उपसरपंचांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात टाकलेल्या हारांची फुले अद्याप सुकली नसली तरी त्याअगोदर गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या या महिला पदाधिकारी सोडवतील, अशी आशा जनतेला लागली आहे.