पांढरे सोने झळाळले ! कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:22 IST2021-01-01T13:17:56+5:302021-01-01T13:22:18+5:30
कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

पांढरे सोने झळाळले ! कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी
- संजय देशमुख
जालना : राज्यात कापसाचे उत्पादन घेणाऱ्या १८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ६० लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर कापसाचे बंपर उत्पादन झाले असते, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी अधिक खरेदी केली. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे.
कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी झाली होती. तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली. यंदा सीसीआयने राज्यात कापूस खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरू केले होते. आजघडीला त्यांच्याकडे कापूस साठविण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने जास्तीत जास्त जिनिंग चालकांशी संपर्क करून त्यांच्याकडे सूत काढण्यासाठी तसेच कपाशीच्या गाठी तयार करण्यासाठी दिला जात आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला असता, शंभरपेक्षा अधिक खाजगी जिनिंग आहेत. त्यात काही ठिकाणी कापसापासून धागा निर्मितीदेखील केली जाते. सध्या सीसीआयकडून कापसाला हमीभाव म्हणून पाच हजार ७०० रुपयांचा दर प्रतिक्विंटलला मिळत असल्याने आजपर्यंत सरासरी या दराने ६० लाख कापूस खरेदीची किंमत ही तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील आतापर्यंतची कापूस खरेदी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची मोठी खरेदी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ५५५ क्विंटल (१२ लाख ४७ हजार १७८), जालना ६ लाख ६७ हजार ८७३ (४ लाख २६ हजार ७५७), परभणी ८ लाख ४३ हजार २९४ (१० लाख ६६ हजार ६६०), बीड ३ लाख ६४ हजार ९०५ (२ लाख १२ हजार ३६६), हिंगोली १ लाख ४४ हजार १८१ (५० हजार ३४२), नांदेड जिल्ह्यात २ लाख २४ हजार ७५६ (६ लाख ७० हजार ७६२) कापसाची खरेदी केली आहे. यात कंसातील आकडेवारी ही मागील वर्षीच्या खरेदीचे आहेत.
सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भाव
कापसापासून धागानिर्मिती उद्योगाला यंदा कोरोनानंतर चांगले दिवस आले ओहत. कधी नव्हे, तो सुती धगा ३०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. यंदा जिनिंग उद्योगाने कात टाकली असून, सीसीआयकडून सूतनिर्मिती आणि गठाण तयार करण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने हा उद्योग यंदा तेजीत आहे.
- संजय राठी, संचालक काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेक्सप्रोसिल