पोलिसांनी तातडीने तक्रार न घेतल्यास कारवाई करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:38+5:302021-02-23T04:47:38+5:30
जालना : मागील काही दिवसांपासून दुचाकीचोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी लवकर घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीच नाही ...

पोलिसांनी तातडीने तक्रार न घेतल्यास कारवाई करू
जालना : मागील काही दिवसांपासून दुचाकीचोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी लवकर घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीच नाही तर इतर कोणीतीही तक्रार लवकर न घेतल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली. ते सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीसह इतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच पोलीस दुचाकीचोरीच्या तक्रार घेण्यास उशीर करतात. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागतो. याबाबत पोलीस अधीक्षकांकडेही तक्रारीदेखील झाल्या आहेत. याबाबत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख म्हणाले की, दुचाकीची तक्रार न घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेऊ. जे पोलीस अधिकारी व कर्मचारी दुचाकीसह इतर तक्रारी लवकर घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही एटीएम चोरट्यांच्या मागावर असून, त्यांना लवकरच जेरबंद करू. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पो.नि. सुभाष भुजंग यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.