महिन्याभरापासून तळणी गावचा पाणीपुरवठा बंद - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:36+5:302021-02-07T04:28:36+5:30
तळणी : शेगाव - पंढरपूर या दिंडी महामार्गाच्या खोदकामामुळे तळणी बसस्थानक भागातील मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनी फुटली होती. ...

महिन्याभरापासून तळणी गावचा पाणीपुरवठा बंद - A
तळणी : शेगाव - पंढरपूर या दिंडी महामार्गाच्या खोदकामामुळे तळणी बसस्थानक भागातील मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनी फुटली होती. या घटनेला दोन वर्षे झाली तरीही अद्याप ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यातच महिन्याभरापासून दुसऱ्या पाणीपुरवठा योजनेचे रोहित्र जळल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मंठा तालुक्यातील तळणी गावाला पूर्णा नदी, जुन्यातील विहीर व दलितवस्ती विहीर अशा तीन योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तळणी गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे या तीनही योजनांचे पाणी कमी पडत असल्यामुळे आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी पूर्णा नदीपात्रातील विहिरीवरून जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनी दिंडी महामार्गावरील खोदकामामुळे फुटली. त्यामुळे बसस्थानक भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने जुन्यातील विहिरीवरून गावातील काही भागात तर दलितवस्ती विहिरीवरून काही भागात पाणीपुरवठा सुरू केला. त्यातही जुन्यातील विहिरीवरील विद्युतपुरवठा करणारे रोहित्र जळल्याने महिन्याभरापासून या विहिरीवरून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. केवळ दलितवस्तीची एकमेव पाणीपुरवठा योजना सुरू आहे. दलितवस्ती वगळता बसस्थानक व गावात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही मोठ्या योजना बंद पडल्याने ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आंदोलनेदेखील करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रास्ता रोको करणार : पवार
मेघा कंपनीने केलेल्या रस्ता खोदकामामुळे तळणीतील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी व बसस्थानक भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. दोन वर्ष झाली तरीही कंपनीने दुरुस्ती केलेली नाही. कंपनीने नवीन पाईपलाईन करावी, अन्यथा कंपनीविरोधात २० फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच उद्धव पवार यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
रोहित्र जळल्याने योजना बंद
जुन्यातील विहिरीवरील पाणीपुरवठा योजनेला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र एक महिन्यापूर्वी जळले असून, अद्यापही महावितरणकडून त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे ही योजना बंद आहे.
बबन सरकटे
पाणीपुरवठा कर्मचारी, ग्रा. पं., तळणी
पाणीपुरवठ्यावर लाखोंचा खर्च -
गावाला पाणीपुरवठा नियमित व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून लाखोंचा निधी खर्च होते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व मुबलक पाणी मिळत नाही. यासर्दभात सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.
सुधाकर सरकटे
उपसरपंच, ग्रा. पं., तळणी
तळणी ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजनांचे चार लाखांहून अधिक वीजबिल थकीत असून, वीजबिल भरुन सहकार्य करावे.
ए. एस. जंगम
कनिष्ठ अभियंता, महावितरण, मंठा