कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे माहोऱ्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:05+5:302021-02-05T08:02:05+5:30
बाळासाहेब गव्हले माहोरा : कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे माहोरा गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना चार ते पाच दिवसाआड ...

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे माहोऱ्यात पाणीटंचाई
बाळासाहेब गव्हले
माहोरा : कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे माहोरा गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, सार्वजनिक स्रोतांवर ग्रामस्थांची गर्दी होत आहे. प्रसंगी अनेकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.
जवळपास १२ हजार लोकसंख्येच्या माहोरा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या आठ विहिरी असून, सध्या तीन विहिरींवरून पाणीपुरवठा केला जातो. म्हसरूळ तलाव, कोल्हापूर, गोडवणी येथून पाणीपुरवठा सुरू आहे. माहोरा भणंगा शिवारातील विहीर काही वर्षांपासून विजेअभावी बंद आहे. येथील विद्युत डीपी फोडून चोरट्यांनी आतील साहित्याची चोरी केली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे. गावाच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिरीचे खोदकाम झाले आहे. या विहिरीवरून टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. तसेच गावामध्ये मागील वर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ३ विहिरींचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. शिवाय बाजारपट्टी विभागात एक, बाजार पट्टी भागात दोन, तर बोरसेवाडीमध्ये तीन विहिरी आहेत. फुटणारी पाईपलाईन आणि कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे उपलब्ध जल स्रोतांतून मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनाकडे पाठपुरावा
पाणीपुरवठा पाईपलाईन दुरूस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक दाबाने वीज मिळावी, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. गावासाठी नवीन जलकुंभाचा पाठविलेला प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला असून, त्याला मंजुरी मिळावी, यासाठीही पाठपुरावा केला जात असल्याचे सरपंच वैशाली कासोद, उपसरपंच गजानन साळोक यांनी सांगितले.
रस्ता कामामुळे अडचण
माहोरा - धाड माग, जाफराबाद मार्गाचे काम सुरू असल्याने पाईपलाईन फुटली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईन दुरूस्त करून पाण्याचा सुरळीत पुरवठा केला जाईल, असे ग्रामपंचायत सदस्य तुळसाबाई गाडुळे यांनी सांगितले.
फोटो जलकुंभाचा