२५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:03+5:302021-09-04T04:36:03+5:30
मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब वाहत ...

२५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला
मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब वाहत आहे. या पावसाचा पिकांना फायदा झाला आहे.
दानापूर येथील जुई धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. जर हा पाऊस झाला नसता तर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले असते. ३१ ऑगस्टपर्यंत धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. ३१ ऑगस्टच्या रात्री आणवा, वाकडी, जानेफळ गायकवाड, कोदा, कठोरा बाजार, सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, उंडनगाव आदी भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जुई नदीला गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच मोठा पूर आला. परिणामी, एकाच रात्रीत धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणात आता ३० टक्के पाणीसाठा झाला असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.जी. राठोड यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पूर्णा, केळना, रायघोळ, गिरजा, धामना या नद्यांना पूर आल्यामुळे खडकपूर्णा धरणातील पाणीसाठ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जुई धरणाची पाणीपातळी एकदम कमी झाली होती; मात्र रात्रीच्या पावसाने धरणात समाधानकारक पाणीसाठा आला आहे. तरी पाणीपुरवठा योजना असलेल्या गावांनी पाण्याचा काटकसरीने उपसा करावा. धामणा धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा आहे.
एस.जी. राठोड, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग.