चार तासांत जलवाहिनीची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:38 IST2018-02-15T00:37:30+5:302018-02-15T00:38:10+5:30
शहराला पाणीपुरवठा करणा-या जायकवाडी-जालना योजनेवरील एअर व्हॉल्व्ह थेरगाव (ता.पाचोड) येथे मंगळवारी फुटला होता. पहाटे सहा वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय वाघमारे यांनी सांगितले.

चार तासांत जलवाहिनीची दुरुस्ती
जालना : शहराला पाणीपुरवठा करणा-या जायकवाडी-जालना योजनेवरील एअर व्हॉल्व्ह थेरगाव (ता.पाचोड) येथे मंगळवारी फुटला होता. संबधित एजन्सीच्या कर्मचा-यांनी मध्यरात्रीनंतर २ वाजेपासून दुरुस्तीस सुरुवात केली. पहाटे सहा वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जायकवाडी-जालना योजनेवरील व्हॉल्व्ह फोडून पाणी घेण्याचे प्रकार अंबड, पाचोड परिसरात वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांना सूचना दिल्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याने जालना शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. मंगळवारी दुपारी पाचोड तालुक्यातील थेरगाव परिसरात स्थानिकांनी एअरव्हॉल्व्ह फोडला होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनी रिकामी करण्यात आली. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सकाळी सहा वाजता हे काम पूर्णत्वाकडे गेले. अवघ्या चार तासांत दुरुस्ती पूर्ण झाल्याने जालनेकरांची गैरसोय दूर झाली आहे. नियोजित वेळेनुसार त्या- त्या भागाला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.