फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा मानापूर गावात मात्र पाण्याचा चांगलाच सुकाळ आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा करणारी तालुक्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे.भोकरदन शहरापासून चार कि़मी. अंतरावर मानापूर हे १८३ कुटुंब असलेले गाव असून या गावाची लोकसंख्या ११५० एवढी आहे. या गावाला २०१२ पूर्वी नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तत्कालीन सरपंच योगेश दळवी यांच्या प्रयत्नातून २०१२ - २०१३ मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत दानापूर येथील जुई धरणातून १४ लाख रुपये खर्च करून ४ किलोमीटर पाईप लाईन करण्यात आली तेव्हा पासून मानापूर गावासाठी शासनाला टँकर लावण्याचे काम पडले नाही. यावर्षी तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. मात्र येथील ग्रामस्थांना रोज ६५ हजार लिटर पाणी नियमित सोडण्यात येत आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरींनी तळ गाठला होता. सध्या होत असलेले पाणी शुध्द करून देण्यासाठी स्वतंत्र फिल्टर प्लांटची गरज वर्तवली.ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध निवडणूकगाव म्हटले की राजकारण येते व गावातील सरपंचाची खुर्ची आली की वेगवेळ्या पक्षाची स्पर्धा होते. मात्र मानापूर या गावातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मानापूरला ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा पासून गावातील सर्व पक्षियांनी एकत्र येऊन दळवी यांच्या नेतृत्वाखाली चार पंचवार्षिक पासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली आहे.
दुष्काळातही मानापुरात नळांना दररोज पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:14 IST