Voters Raja will give Mahakaul today! | मतदारराजा आज देणार महाकौल!

मतदारराजा आज देणार महाकौल!

लोकमत न्यूज नेटवर्क । जालना । जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान होत आहे. यानिमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, परतीच्या पावसाचा व्यत्यय मतदानावर पडणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघात ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रावर सीआरपीएफ सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. एकूण ३८ संवेदनशील मतदान केंद्र असून, या सर्व केंद्रांवर प्रत्येक घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. मतदान करताना कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता सक्षमपणे मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कडेकोट बंदोबस्त
१४३७ स्थानिक पोलीस, १११६ होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, औरंगाबाद, मुंबई व नाशिक येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलीस बळ, रेल्वे पोलिसही मदतीला, जिल्ह्यात सर्वत्र रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी.
मतदार यादीत विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे
असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ,
नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक
केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.
कशी मिळवू शकता
मतदान केंद्राची माहिती?
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही संकेतस्थळावर आहे.
मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का ?
सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अपर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
मतदारांसाठी २२८३ व्हीव्हीपॅट
विधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार २८९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
कुठे काही गडबड झाली तर काय ?
शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि संबंधितांवर कडक कारवाई करेल. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत एसपी (पोलीस अधीक्षक) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.
ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?
ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४६१ व्हीव्हीपॅट, ३०० कंट्रोल युनिट तर ४५२ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.

यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक, पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड

Web Title: Voters Raja will give Mahakaul today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.